ज्यांनी जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंची चेष्टा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून आज ते बसले – पाटील

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतर आज राष्ट्रवादीसाठी महत्त्वाचा होता. आज राष्ट्रवादीतील दोन्ही गटाचे मेळावे झाले यात दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आपली भूमिका कार्यकर्ते आणि नेत्यांच्या समोर मांडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. या काळात हा पक्ष मोडण्याचा अनेकांनी प्रयत्न केला आहे. मात्र त्यांना कधीच कुणी दाद दिली नाही, अशी स्पष्टोक्ती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (jayant patil) यांनी केली.

कधीही कुणीही आदरणीय शरद पवार साहेबांपासून (sharad pawar) दूर गेले नाही. पण आज काही लोक दुर्दैवाने दूर गेले याचे शल्य आहे. आज या व्यासपीठावर पवारसाहेबांच्या डावीकडे आणि उजवीकडे बसणारे लोक नाहीत याचे आमच्या मनात शल्य आहे. जे गेलेत त्यांच्यावर मी भाष्य करत नाही. काही प्रश्न, विवंचना असतील. पण त्या सर्वांच्या मागे उभे राहण्याचे काम आदरणीय पवारसाहेबांनी एकदा नाही अनेकदा केले. त्याचे मूर्तिमंत उदाहरण अनिल देशमुख आहेत, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

मला प्रदेशाध्यक्ष बनून पाच वर्षे झाली. पाच वर्षे झाल्यानंतर एका महिन्याभराने पवारसाहेबांना भेटलो तेव्हा साहेबांना म्हटले की, पाच वर्षात कधीच सु्ट्टी घेतली नाही. आता सुट्टीचा टाईम आला आहे. तुम्ही जो निर्णय घ्याल मला तो मान्य आहे. त्यानंतर साहेबांनी मिटींग घेतली. पुन्हा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. जिथे आपल्या पक्षाचे आमदार नाहीत अशा राज्यातील ठिकाणी कार्यकर्त्यांची भेट घेतली. महाराष्ट्रात २८८ मतदारसंघ आहेत त्यापैकी १५० पेक्षा जास्त मतदारसंघात जाण्याचे काम महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे होते आणि ते मी केले. पक्षाचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्रात दोनदा जाऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.

आमच्याबरोबर अनेक लोक होते. शरद पवारसाहेबांनी अनेकांना मोठमोठ्या संधी दिल्या. पण आता विठ्ठलाच्या सभोवताली बडवे आहेत, ते आम्हाला भेटू देत नाहीत असं सांगायला लागले आहेत. दोन वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर पुण्याला भेटले तेव्हा त्यांच्या डोक्यावर फुले पगडी पवारसाहेबांनी ठेवली होती. पगडी ठेवली तेव्हा बडवे आडवे आले नाहीत का.. आता फुलेंचा विचार काढून ज्यांनी जोतिबा फुले आणि सावित्रीबाईंची चेष्टा केली त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले.. आता महाराष्ट्राला काय उत्तर देणार? असा थेट सवाल केला. २०१९ मध्ये सरकार स्थापन करताना मंत्री म्हणून नाव देताना पवारसाहेबांनी पहिले नाव भुजबळ साहेबांचे दिले. तेव्हा बडवे आडवे आले नाही का.. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात गैरसमज नसावा म्हणून मी हा खुलासा केला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

आज देशात पक्ष चोरी करणाऱ्यांचा थयथयाट सुरू आहे. जो आम्हाला आवडत नाही, जो आडवा येतो त्याचा पक्षच आम्ही काढून घेतो. जे शिवसेनेच्या बाबतीत झाले तसाच मानस राष्ट्रवादीच्या बाबतीत ठेवून काही लोक काम करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय पटलावरून नामशेष करण्याची कोणी भूमिका घेत असेल तर माझे आवाहन आहे की अजून सर्वांनी विचार करा. शरद पवार या नावाचा झंझावात महाराष्ट्रात फिरायला लागला तर काय परिस्थिती होईल याची छोटीसी चुणूक सातारा आणि कराडमध्ये बघितलेली आहे. वय कितीही झाले तरी या नेत्याचा, या योद्ध्याचा भारतात दरारा आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

अमोल कोल्हे (amol kolhe) साहेबांची क्लिप बघितली, ते म्हणाले की बापाला कधी विसरायचं नसतं, आपल्या बापाच्या चेहऱ्यावरील सुरकूत्या या कष्टाने निर्माण झालेल्या आहेत, हे मनात ठेवा. मी डॉ. अमोल कोल्हे यांना सांगेन की पक्षाचे प्रचार प्रमुख व्हा. सर्व महाराष्ट्रात फिरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा स्वाभिमानाचा बाणा कसा जपला आहे हे तुम्ही सांगा. सर्व महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार साहेबांच्या मागे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

उद्धव ठाकरे यांची साथ सोडून जे चाळीस आमदार गेले, त्यांची जी तक्रार होती तीच तक्रार पुन्हा तेथे येऊन बसली आहे. उद्धव ठाकरेंच्या आमदारांच्या मनात पुन्हा फिरायचे वेध लागलेले आहेत, ही काळ्या दगडावरील रेख लिहून घ्या, अशी खात्रीही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

राजकारणात एवढी अस्वस्थता यापूर्वी पाहिली नव्हती. काही तत्त्वे, मर्यादा, धोरणे ही असली पाहिजेत. जर हे सोयीस्करपणे आपण सोडायला लागलो तर आपल्याला फॉलो करणारे काय म्हणतील याचाही विचार केला पाहिजे, असेही जयंत पाटील म्हणाले.

महाराष्ट्राच्या विधानसभेत १०५ आमदार भाजपचे आहेत. त्या निष्ठावंतांपैकी केवळ आठ मंत्री झाले. म्हणजे दुसऱ्याची कबर खोदताना स्वत:चीच कबर खोदण्याचे काम महाराष्ट्रात सुरु आहे. महाविकास आघाडीला तीन पक्षांची रिक्षागाडी म्हणून हिणवले गेले पण रिक्षा एवढी चांगली चालत होती म्हणून त्यांनी ती रिक्षा मोडण्याचे काम केले, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला. एखादा क्षण येतो जेव्हा माणूस विचलित होतो, तेव्हा त्याने स्वत:ला सावरून पुन्हा आपल्या मूळाकडे जायला हवे. ही मानसिकता दिसत नसल्याची खंतही जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

मी जे बूथ कमिट्यांबद्दल आवाहन करत होतो, ते नरेंद्र मोदी यांनीही केले आहे. बूथ कमिटी सक्षम केल्याशिवाय पक्ष वाढणार नाही हा आग्रह मागील पाच वर्षांपासून मी करत आलो आहे. आगामी निवडणुका कधीही येऊ शकतात. आज पवारसाहेबांच्या मागे सामान्य माणसे उभी आहेत. आपण आदरणीय पवारसाहेबांना सक्षम असा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार करून दाखवूया, यासाठी कामाला लागूया, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.