नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवणाऱ्या हिंदू तरुणाला सोलापुरात बेदम मारहाण

Solapur – भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) प्रेषित मोहम्मद (Prophet Muhammad) यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठा गदारोळ पाहायला मिळत आहे. शर्मा यांचे भाजपचे प्राथमिक सदस्यत्व निलंबित करण्यात आले आहे. सोबतच नवीन कुमार जिंदाल (Navin Kumar Jindal) यांनाही पक्षाच्या सदस्यत्वावरून निलंबित करण्यात आले आहे. नुपूर शर्मा यांचे प्राथमिक सदस्यत्व सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व घडामोडी घडल्यानंतर शर्मा यांनी आपल्या वक्तव्यावरून माफीही मागितली होती. रागाच्या भरात ते वक्तव्य केल्याचा खुलासा त्यांनी केला होता.

दरम्यान, नुपूर शर्मा यांच्याविरुद्ध देशभर निदर्शने केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील याचे पडसाद उमटले आहेत. यातच आता नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवल्याने सोलापुरात (Solapur) तरुणाला मुसलमानांच्या जमावाकडून बेदम मारहाण करण्यात आली आहे. जबर मार लागल्याने तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

ही घटना सोलापुरातील शांती नगर परिसरात घडली आहे. नरेंद्र श्रीराम याने नुपूर शर्मांच्या समर्थनार्थ स्टेटस ठेवले होते. मारहाणीचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. नरेंद्र श्रीराम याला मारहाणीत लाथा-बुक्क्या तसेच फायटर हत्याराने जबरी मारहाण केली आहे. मारहाण केल्याप्रकरणी वसीम पठाण, निसार सय्यद, अल्ताफ शेख, नोहिद यांच्यासह पाच ते सहा जणांविरोधात एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला करण्यात आला आहे.