आम आदमी पक्षाने काँग्रेसचा विजय मान्य केला : पणजीकर

पणजी : आम आदमी पक्षाची नेता अतिशी यांनी काँग्रेस पक्षाचे उमेदवार जिंकून आल्यावर भाजपमध्ये जातील असे विधान केल्याने, गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे मीडिया अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी सोमवारी म्हटले की असे विधान करून आपने काँग्रेस पक्ष विजयी होणार हे मान्य केले आहे.

पणजीकर यांनी सोमवारी पणजीत पत्रकार परिषद घेऊन गोव्यात काँग्रेस सरकार स्थापन करणार असल्याचे सांगितले. दिल्ली काँग्रेसचे उपाध्यक्ष अली मेहेंदी, युवक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. वरद म्हार्दोळकर, अखिलेश यादव, साईश आरोसकर या वेळी उपस्थित होते.

आपच्या गोवा प्रभारी आतिशी यांनी काँग्रेसचे आमदार निवडून आल्यानंतर पक्षांतर करून भाजपमध्ये जाणार असे विधान केल्यावर त्यांना प्रतीउत्तर देताना पणजीकर म्हणाले की, आप एकही जागा जिंकू शकणार नाही. “चर्चिल आलेमांव हे काँग्रेसचे नसून तृणमूल काँग्रेसचे आहेत, याची सुद्धा जाणीव त्यांना नाही. यासाठी त्यांनी राजकारणाचा राजीनामा द्यावा.” असे ते म्हणाले.

“नावेलीतील काँग्रेस उमेदवार आवेर्तान फुर्तादो, कुडतरीचे मोरेनो रेबेलो, कळंगुटचे उमेदवार मायकल लोबो, वास्कोचे उमेदवार कार्लूस आल्मेदा हे पूर्वी भाजपशी संबंधित होते आणि निवडून आल्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये जाणार असे आतिशी बोलत आहे. तसेच कुंकळ्ळी आणि हळदोणे येथून सुद्धा काँग्रेसचे उमेदवार जिंकणार असे ती मान्य करत आहे यासाठी मी त्यांचा आभारी आहे.’’ असे पणजीकर म्हणाले.

आप’मध्ये दाखल झालेले अनेक सदस्य भाजपच्या पार्श्वभूमीचे आहेत, याकडे पणजीकर यांनी लक्ष वेधले. ‘’विश्वजीत राणे, माजी भाजप सदस्य आणि उमेदवार, महादेव नाईक, माजी भाजप मंत्री, सत्यविजय नाईक, अलीना साल्डाणा, माजी भाजप मंत्री, रामराव वाघ, सांत आंद्रे मतदारसंघातील भाजपचे 2017 चे उमेदवार, सुदेश मयेकर, किसान मोर्चाचे माजी भाजप उपाध्यक्ष आणि कळंगुट ब्लॉकचे सदस्य, अनूप कुडतरकर, माजी भाजप युवा मोर्चा सदस्य, अनिल गावकर , माजी भाजप सदस्य, बाबू नानोस्कर, माजी भाजप, किंवा राजेश कळंगुटकर, भाजपशी जवळचे संबंध असलेले आरएसएस सदस्य, हे सर्व भाजपशी संबंधित आहेत, असे पणजीकर म्हणाले.

“आपचे सांता क्रुझचे उमेदवार अमित पालयेकर यांची मातोश्री भाजपशी संबंधित आहे की नाही हे आतिशी यांनी तपासावे. दुसरे म्हणजे, सांता क्रुझचे काँग्रेसचे उमेदवार सुडोल्फ फर्नांडिस हे बाबूश मोन्सेरात यांचे जवळचे असल्याने ते निश्चितच जिंकणार आणि भाजपात जाणार असे त्या सांगत आहेत. आमचे उमेदवार विजयी होत आहेत हे ती मान्य करत आहे आणि त्यामुळे ‘आप’ने बॅग भरून दिल्लीला परत जावे.’’ असे पणजीकर म्हणाले.

अ‍ॅड. म्हार्दोळकर म्हणाले की, काँग्रेसवर टिका करून ‘आप’ने स्वतःचा पर्दाफाश केला आहे. ‘आप’ ही भाजपची बी टीम आहे. ते सर्वांना माहीत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आपने कुठ्ठाळी, मुरगाव, पणजी आणि इतर मतदारसंघात मतांचे विभाजन करण्यात भूमिका बजावली आणि भाजपचा मार्ग मोकळा झाला.’’ असे ते म्हणाले.
“आपने मतांचे विभाजन केले नसते तर २०१७ मध्ये आम्हाला पूर्ण बहुमत मिळाले असते.” असे ते म्हणाले.

मतांचे विभाजन करण्यासाठी भाजप ‘आप’ला आर्थिक मदत करत असल्याचे अली मेहेंदी म्हणाले. ‘‘दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकारने दिल्लीतील चर्च पाडले. मग गोव्यात येवून खोटं बोलले की ती त्यांनी पाडली नाही.” असे ते म्हणाले.