सायेब… गौतमी पाटील गावात येतेय, दोन दिसाची सुट्टी द्या; एसटी चालकाचा रजेचा अर्ज व्हायरल

सातारा- नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) हिची क्रेझ दिवसेंदिवस वाढतच आहे. लोक गावजत्रा असो, कोणाचा वाढदिवस असो किंवा अगदी हळदीच्या कार्यक्रमालाही गौतमीला बोलवत आहेत. आपल्या गावात किंवा तालुक्याच्या अथवा जिल्ह्याच्या ठिकाणी गौतमीच्या डान्सचा कार्यक्रम व्हावा, अशी प्रत्येकाची इच्छा असते. गौतमीच्या कार्यक्रमांना लोक मोठ्या संख्येने गर्दीही करतात. मात्र आता गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी एका एसटी चालकाने चक्क दोन दिवसाची रजा मागितली आहे.

गावात गौतमी पाटील येणार आहे. त्यामुळे दोन दिवसांची सुट्टी द्या, असा रजेचा अर्ज एका एसटी चालकाने डेपो मॅनेजरला केला आहे. त्याचा हा रजेचा अर्ज सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सांगलीच्या तासगाव डेपोतला हा एसटी चालक आहे. त्याने चक्क गौतमीचा कार्यक्रम पाहण्यासाठी रजा टाकली आहे. मात्र धक्कादायक बाब म्हणजे ज्या नावाने हा अर्ज व्हायरल केला आहे, त्या चालकाने असा कोणताही अर्ज केला नसल्याचं उघड झालं आहे. तसा रजेचा अर्ज तासगाव एसटी आगाराकडे आला नसल्याचंही कळतं. त्यामुळे कोणीतरी खोडसाळपणाने अर्ज व्हायरल केल्याचे प्रकार घडला आहे.

अर्ज सोशल मीडियावर व्हायरल
या अर्जाचं सत्य वेगळं असलं तरी आणि एसटी चालकाने अर्ज केला नसला तरी हा गमतीशीर अर्ज आता सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. एसटी चालकाने 22 आणि 23 मे रोजी सुट्टी मागितल्याचं अर्जातून स्पष्ट होत आहे. हा अर्ज व्हायरल झाल्यानंतर गौतमीच्या चाहत्यांनी तो आणखीनच व्हायरल केला आहे. तर या अर्जावर सदर एसटी चालकाची कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्यामुळे या अर्जाबाबतचा संभ्रमही कायम आहेच.