मुद्द्यांची लढाई आता गुद्यांवर आली; तृणमूलच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा काँग्रेस समर्थकांवर आरोप

म्हापसा : गोव्यात सध्या निवडणुकीचे वारे वाहत असून मुद्द्यांची लढाई आता गुद्यांवर आली आहे का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. म्हापसा पोलिसांनी म्हापसा येथील सरकारी संकुलात तृणमूल काँग्रेस (TMC) च्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, म्हापसा येथील या हल्ल्याचा निषेध करत, टीएमसीच्या गोवा युनिटने आरोपींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी दोषींवर कारवाई करण्याची मागणी करत निवडणूक आयुक्तांकडेही कारवाई करण्याची मागणी केली.

या कृत्याचा आम्ही निषेध करतो. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी दोषींवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार आणि तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष किरण कांदोळकर यांनी केली. म्हापसा येथील काँग्रेस उमेदवाराविरोधात पक्षांतर्गत असंतोष आहे. INC ला माहीत आहे की त्यांचे समर्थक तारक आरोलकर यांच्याकडे वळत आहेत आणि INC जिंकणार नाही म्हणून ते आगामी निवडणुकांमध्ये अडथळा आणण्यासाठी सर्व घाणेरड्या युक्त्या वापरत आहेत असं कांदोळकर यांनी म्हटले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोकोरो येथील रहिवासी देवेश वर्मा, जो टीएमसीचा समर्थक आहे, याला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. म्हापसा पोलिसांनी या प्रकरणी शशांक नार्वेकर, जेम्स डिसोझा यांच्यासह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. डिसोझा, नार्वेकर आणि इतर अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 341, 324, 506 (ii) 34 नुसार गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी म्हापसा पोलीस अधिक तपास करत आहेत.

राज्यसभा खासदार सुष्मिता देव म्हणाल्या की गोवा हे शांतताप्रिय राज्य आहे आणि राज्याच्या राजकारणात अशा प्रकारच्या हिंसाचाराच्या घटना घडणे दुर्दैवी आहे. म्हापसा टीएमसीचे उमेदवार तारक आरोलकर म्हणाले की, “मापुसामध्ये भीतीचे वातावरण आहे कारण पक्षाच्या कार्यकर्त्यांवर हल्ले झाले आहेत आणि आम्ही अशा कृतीचा निषेध करतो. स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्यासाठी आरोपींना अटक करावी.”