निवडणुकांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांची साथ सोडा; प्रकाश आंबेडकर यांचे आवाहन भटक्या विमुक्तांना आवाहन

पिंपरी – ब्रिटीशांच्या काळापासून भटक्या विमुक्त जातींवर गुन्हेगारीचा शिक्का आहे. त्यातूनच आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या हा समाज खचला आहे. या परिस्थितीत राजकीय पक्ष भटक्या, विमुक्तांना थारा देणार नाहीत. त्यासाठी आपले अस्तित्व  राखण्याकरिता येणार्‍या निवडणुकांमध्ये प्रस्थापित राजकीय पक्षांची साथ सोडा आणि आपले वेगळेपण दाखवून द्या. तरच हे सगळे पक्ष तुमच्या पायाशी लोंटागण घालत येतील, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर (Adv. Prakash Ambedkar) यांनी केले.

मतदार मालक आहे. नरेंद्र मोदी सुद्धा लोकांनी निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे. परत, पाच वर्षांनी आपल्यासमोर येणार आहे. त्यामुळे मतदारांनी घाबरले नाही पाहिजे. राजकारणात स्थान निर्माण करायचे असेल तर मी स्वत:ला विकणार नाही, अशी खूणगाठ बांधा, असेही आंबेडकर म्हणाले. वडार समाजाच्या विविध प्रश्नांवर लक्ष्य वेधण्यासाठी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील मैदानात आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल जाधव  यांच्यापासून वडार समाजाने लढाईला  सुरुवात केली असं मी समजतो आहे. वडार समाजाकडे कलाकृती आहे. जात्यासह विविध अवजारे हा समाज बनवतो. पण, त्याचा प्रचार करता आला नाही. भटक्या विमुक्त जातींना ब्रिटीशांच्या काळापासून गुन्हेगारी जमात ठरवले गेले. मात्र, त्या काळातही हा समाज ब्रिटिशांना शरण गेला नाही. त्यातूनच आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या हा समाज खचला आहे.

राजकीय पक्ष भटक्या, विमुक्तांना थारा देणार नाहीत. कारण, संधी मिळाली तर हा समाज पुढे जाईल, अशी भीती त्यांना वाटते. त्यासाठी आपले वेगळेपण दाखवा. या प्रस्थापित पक्षांची साथ सोडा. ते उमेदवारी घे म्हणत आपल्या दारात येतील, असे आवाहन करत भटक्या विमुक्त समाजातील वडार समाजातील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने त्यांना अनुदान दिले पाहिजे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली.

वडार  समाज महामेळाव्याचे मुख्य संयोजक अनिल जाधव आपल्या प्रास्ताविक भाषणात म्हणाले की ,वर्षानुवर्ष वडार समाजाच्या विविध मागण्या दुर्लक्षित आहेत. या समाजाला न्याय मिळवुन देण्यासाठी व त्यांच्या मागण्यांकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते . यामध्ये वडार समाजाला मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, शासकीय नोकऱ्यांमध्ये स्वतंत्र आरक्षण, जाचक अटी विना जातीचे दाखले मिळावे, क्रिमिलिअरची अट रद्द करावी, वडार समाज जेथे राहतो त्या जागा त्यांच्या नावावर करण्यात याव्या, वडार समाजाला गुन्हेगारी जात म्हणुन सरकारी नोंदीत असलेला ठपका काढून टाकावा, वडार समाजातील युवकांना उद्योगधंद्यासाठी बिनव्याजी कर्ज देण्यात यावे या व अशा अनेक प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते .आता आपल्यायला न्याय मिळवून्न देण्याची जबाबदारी आदरणीय प्रकाश आंबेडकर यांनी घेतली आहे .आता आपल्याला नेतृत्त्व मिळाले आहे . असे अनिल जाधव यावेळी म्हणाले .

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश  उपाध्यक्ष अनिल जाधव ,सागर ओरसे ,शामराव विटकर ,अनिल विटकर ,बेबीताई जाधव ,पिंटू विटकर ,परेश शिरसंगे ,बाबासाहेब दांडेकर , तमा लष्करे ,राहुल विटकर ,राजू धोत्रे ,अनिल कुऱ्हाडे यासह वडार समाजाचे प्रमुख पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते .या महामेळाव्यास पुणे शहर , जिल्हा व पिंपरी चिंचवड येथील वडार  समाजाचे युवक , महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने सहभागी झाले होते .