विरोधकांच्या आघाडीचा नेता कोण? केजरीवाल, ममता आणि नितीश यांना धक्का

ABP news Survey On Opposition Alliance: लोकसभा निवडणुकीसाठी सर्व प्रमुख पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे . भाजपच्या नेतृत्वाखालील NDA चा परिवार वाढत आहे, त्यामुळे 26 विरोधी पक्षांनीही महाआघाडी स्थापन केली आहे. भाजपला टक्कर देण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या या पक्षांनी आपल्या युतीचे नाव INDIAअसे ठेवले आहे. मात्र विरोधी पक्षांनी अद्याप त्यांच्या नेत्याच्या नावाची घोषणा केलेली नाही.

दरम्यान, अशा राजकीय वातावरणात जनमत जाणून घेण्यासाठी सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी अखिल भारतीय सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात विरोधी महाआघाडीच्या नेत्याच्या नावाबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. ज्याचे निकाल आश्चर्यकारक होते. या विरोधी आघाडीचा समन्वयक कोण असावा असा प्रश्न सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तरात सर्वेक्षणात सहभागी असलेल्या 31 टक्के लोकांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांचे नाव घेतले. तर 12 टक्के लोकांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची निवड केली.

टीएमसीच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या निमंत्रक असाव्यात, असे सर्वेक्षणात सहभागी 8 टक्के लोकांचे मत आहे. तर 10 टक्के लोकांनी आपचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे नाव घेतले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे विरोधी आघाडीचे समन्वयक असावेत, असे ६ टक्के लोकांनी म्हटले आहे. तर 33 टक्के लोकांनी कोणतीही भूमिका मांडली नाही.