अजिंक्य रहाणेच्या फ्लॉप शोमुळे वाढली टीम इंडियाची चिंता? पाचव्या क्रमांकासाठी शोधावा लागणार दावेदार

Ajinkya Rahane : कसोटी फॉरमॅटमध्ये टीम इंडियासाठी (Team India) पाचव्या क्रमांकाची समस्या कायम आहे. WTC फायनलमध्ये रहाणेने 89 धावांची शानदार खेळी करत चांगले पुनरागमन केले. मात्र वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत रहाणे दोन्ही सामन्यात फ्लॉप ठरला आहे. रहाणेचा कसोटी विक्रम पाहता आता टीम इंडियाने नवे पर्याय शोधावेत, असे वाटते.

IPL च्या WTC फायनलमधील रहाणेची कामगिरी पाहून त्याला पुन्हा संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. पहिल्या कसोटीत रहाणेला तीन धावा करता आल्या होत्या, तर दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रहाणेने केवळ 8 धावा केल्या होत्या. वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या संघासमोर रहाणेच्या या कामगिरीमुळे संघाची चिंता आणखी वाढली आहे. रहाणेला शेवटच्या कसोटी फॉरमॅटच्या शेवटच्या १८ डावांमध्ये केवळ तीन वेळा अर्धशतक झळकावता आले आहे. डिसेंबर 2020 पासून रहाणेने कसोटीत एकही शतक झळकावलेले नाही.

टी-20 सोबतच, टीम इंडियाने कसोटीतही भविष्यातील संघ तयार करण्यास सुरुवात केली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी दोन महत्त्वाचे बदल करण्यात आले. सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वालला स्थान मिळाले, तर अनुभवी फलंदाज पुजाराला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. आता शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. विराट कोहली मात्र चौथ्या क्रमांकावर खेळणार आहे.

पाचव्या क्रमांकाचा प्रबळ दावेदार संघात श्रेयस अय्यर आहे ज्याने 10 कसोटींच्या 16 डावांमध्ये 666 धावा केल्या आहेत. अय्यरने कसोटीत एक शतक आणि पाच अर्धशतके झळकावली आहेत. मात्र, दुखापतीमुळे अय्यर डब्ल्यूटीसी फायनल खेळू शकला नाही. अय्यर झपाट्याने त्याचा फिटनेस परत मिळवत आहे. यावर्षी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत अय्यरचे पुनरागमन निश्चित असल्याचे मानले जात आहे. रहाणेच्या जागी अय्यर संघात येण्याची दाट शक्यता आहे. अय्यरकडे कसोटी फॉरमॅटमधील भावी कर्णधार म्हणूनही पाहिले जात आहे.