शरद पवार, हे घ्या ‘भोसले’ कुळाचे पुरावे, आणि आता माफी मागा!! – आचार्य तुषार भोसले

शरद पवार (Sharad Pawar) हे देशातले मोठे नेते मानले जातात. मला वाटायचे की ते कोणतेही वक्तव्य संपूर्ण माहिती घेऊन आणि खात्री करुन करतात. पण हा माझा मोठा गैरसमज निघाला, अनेक दिवसांपासून माझ्याबद्दल सोशल मिडियातून व्हायरल केले जात आहे की हा ‘भोसले’ नाही तर ‘शालिग्राम’ आहे ‘मराठा’ नाही तर ‘ब्राह्मण’ आहे.

मी कधीपासूनच हे कोण पसरवत आहे ? याच्या शोधात होतो. पांडुरांच्या कृपेने आषाढी एकादशीच्या दिवशी हे मला कळलं की याचे ‘मास्टरमाईंड मिस्टर शरद पवार’ आहेत! असा पलटवार भाजपा आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Acharya Tushar Bhosale) यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वसंत स्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांसमोर बोलताना केला. या वेळी व्यासपीठावर त्यांचे समवेत भाजप प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे उपस्थित होते.

मराठा समाजातल्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या आणि आध्यात्मिक क्षेत्राची आवड असलेल्या मला भाजपात संधी मिळाली ; आम्ही जे ‘धर्मकार्य’ सुरु केले आहे त्यामुळे पवार साहेब इतके धास्तावले की त्यांनी माझे आडनांव तपासा असे बोलून त्यांचे आवडते ‘जातीवादाचे’ शस्त्र बाहेर काढले .

पण पवार साहेब छत्रपती शिवाजी महाराजांनी गौरवान्वित केलेल्या ‘भोसले’ कुळात जन्माला येणं हे माझं भाग्य आहे. ‘मराठा-अध्यात्म आणि भाजप’ हे समीकरण तुमच्या पचनी पडत नाही म्हणुन तुम्ही माझे आडनांव तपासायची भाषा करताय ?

तुम्ही शाळेत नांव तपासायला सांगितले म्हणुन मी माझा आणि माझ्या वडिलांचा शाळा सोडल्याचा दाखला आणलाय. हे घ्या माझा मिश्रीलाल भिकचंद छाजेड विद्यामंदिर नांदगांव चा प्राथमिक व्ही. जे. हायस्कूल नांदगांव चा माध्यमिक शाळा सोडल्याचा दाखला आणि आर.वाय.के. कॉलेज, नाशिक चा दाखला ज्यात स्पष्टपणे माझे नांव ‘तुषार शालिग्राम भोसले’ असे आहे.

एवढेच नाही हा घ्या माझे वडिल शालिग्राम पितांबर भोसले यांचा आमडदे येथील शाळा सोडल्याचा दाखला. म्हणुन पवार साहेब, डंके की चोटपर सांगतो तुमच्या दुर्दैवाने मी भोसले आहे, मराठा आहे आणि भारतीय जनता पक्षात आहे.

आमचे मूळगांव आमडदे ता. भडगांव जि. जळगांव हे संपूर्ण ‘भोसले’ या कुळाचेच आहे. तुमचे धुळे जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले हे देखील आमच्या गांवाचे आहेत, पारोळ्याचे तुमचे माजी आमदार सतिष अण्णा पाटील यांच्या भगिनी आमच्या गावात आहेत. माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या कन्या आणि अशोकराव चव्हाण यांच्या भगिनी या देखील आमच्या गावात आहेत. हे सर्व भोसले आणि मी ‘भाजपा’त आहे म्हणुन मी भोसले नाही , हा कोणता नियम पवार साहेब ?

हे सर्व कागदपत्र मी आपणांस पोस्टाने पाठवित आहे. आपण सखोल तपास करा,खात्री करा आणि मग मी भोसले नसल्याचा किमान एक तरी पुरावा द्या नाहीतर चुकीचे बोलल्याबद्दल माफी मागा. माझ्यासारख्या सर्वसामान्य ३२ वर्षाच्या कार्यकर्त्याबद्दल ४ वेळा मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री राहिलेल्या देशातील ८२ वर्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने समाजात असा कांगावा करणं तुम्हाला शोभत नाही पवार साहेब !