“आदेशने विवाहबाह्य संबंध ठेवले तर मी…”, अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचं उत्तर चर्चेत

‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका निभावणाऱ्या सुचित्रा बांदेकर (Suchita Bandekar) सध्या चर्चेत आहेत. सुचित्रा बांदेकर यांनी त्यांचे पती आदेश बांदेकर (Adesh Bandekar) यांचे विवाहबाह्य संबंध असल्यास त्या काय करतील, याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटातील भूमिकेशी त्या किती रिलेट करतात? याबद्दल त्या खुलेपणाने बोलल्या.

अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांनी या चित्रपटात अगदी वेगळी भूमिका साकारली आहे. या चित्रपटात त्यांच्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं दाखवलं आहे. तर या चित्रपटाच्या शेवटी चित्रपटातील नवऱ्याबद्दल त्या काय निर्णय घेतात हेही प्रेक्षकांना पाहायला मिळतं.

‘बीबीसी मराठी’ला दिलेल्या मुलाखतीत या भूमिकेशी त्या किती रिलेट करू शकल्या हे त्यांनी सांगितलं आहे. त्या म्हणाल्या, “तिची भूमिका बघून मी रिलेट करू शकले पण तिची गोष्ट मी माझ्या आयुष्याशी रिलेट करू शकले नाही. कारण आदेश खूप चांगला आहे. तो लफडी वगैरे करत नाही किंवा त्या वाट्याला कधी जातही नाही. नाहीतर चित्रपटातील पल्लवी जशी रिॲक्ट झाली आहे त्यापेक्षा चौपट मी रिॲक्ट होईन हे आदेशला माहीत आहे.” सुचित्रा बांदेकर यांनी दिलेलं हे मजेशीर उत्तर खूप चर्चेत आलं आहे.