..म्हणूनच, आई-वडिलांची अन् पोहरादेवीची शपथ घ्यावी लागते; चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर निशाना

भाजपाशी बेईमानी केल्यावर त्यांच्या नेत्यांवर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) टीका करीत आहेत, ते राजकारणातील खालच्या स्तरावर उतरले आहेत. म्हणूनच ते आई-वडिलांची आणि पोहरादेवीची शपथ घेत आहेत, अशी घनाघाती टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chadrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

ते नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधत होते. उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली आहे, असे सांगून श्री बावनकुळे यांनी अमरावती येथील सभेतून उद्धव ठाकरे यांनी भाजपा व नेत्यावर केलेल्या आरोपांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, 2019 मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असा कौल दिला होता.जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता तुम्ही शरद पवार सोबत कट करून सत्तेवर आले. त्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना भावासारखा सांभाळले. त्यांना मुख्यमंत्री होऊ न देण्यासाठी शरद पवारांच्या कटाला साथ द्यायची होती तिथे त्यांनी साथ दिली.

मीडियातूनच भाजपावर टीका
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी विदर्भ वैधानिक विकास मंडळाला स्थगिती दिली, नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन घेतले नाही, डीपीसीच्या पैसे कमी केले, सिंचन आणि रस्त्यांचा बॅकलॉग वाढला. सत्ता असताना विदर्भाच्या विकासाकडे लक्ष दिले नाही. विदर्भाची जनता त्यांच्यावर नाराज आहे. मुख्यमंत्री झाल्यावर केवळ दोन दिवस मंत्रालयात येत असेल तर हा महाराष्ट्राचा आणि विदर्भाचा अपमान आहे. त्यांच्याकडे नेते नाही आणि मानसेही नाहीत त्यामुळे मीडियाच्या माध्यामतून ते भाजपावर टीका करीत आहेत.

पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्ट करावे
2024 पर्यंत एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री राहणार आहेत.आम्ही कुठेही भूकंप घडवणार नाही.काँग्रेस पक्षातून कोणी भाजपमध्ये येणार असेल तर त्यांच्यासाठी भाजपाचे दुपट्टे तयार आहे. मात्र काँग्रेसने आपला पक्ष सांभाळून ठेवावा. कॉंग्रेसमध्ये भूकंप होणार आहे का हे पृथ्वीराज चव्हाण यांनी स्वत: स्पष्ट करावे, असाही टोला त्यांनी लगावला.