‘ओबीसींना डिवचण्याचा प्रयत्न केला तर सोडणार नाही’, आव्हाडांच्या वक्तव्यानंतर बावनकुळे संतापले

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नीट आणि राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांचे एक वक्तव्य सध्या चांगलंच गाजत असून त्यावरून आता नवा वाद उभा राहण्याचे चिन्ह आहेत. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात जितेंद्र आव्हाड यांनी ‘माझा OBC समाजावर वर फार विश्वास नाही’ असं वक्तव्य केलं आहे. याबाबतचा व्हिडीओ भाजपने आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे.

‘ओबीसींवरती माझा काही फार विश्वास नाही. कारण जेव्हा मंडल आयोग आला तेव्हा मंडल आयोगाचं आरक्षण ओबीसींसाठी होतं, पण जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा ओबीसी लढायला मैदानात नव्हते, कारण ओबीसींना लढायचं नसतं,’ असं जितेंद्र आव्हाड या व्हिडीओत म्हणता दिसत आहेत.

‘ओबीसींवरती ब्राम्हण्यवादाचा इतका पगडा बसलाय. आपण श्रेष्ठ आहोत. पण त्यांना हे माहिती नाही की चार पिढ्यांपूर्वी आपल्या बापाला, आजोबाला पणजोबाला देवळात सुद्धा येऊ द्यायचे नाहीत. हे सगळे विसरलेत. आता आरक्षणाच्या निमित्ताने का असेना पुढे येतायत. पण नुसतं घरात बसून व्हॉट्सअप करुन चालणार नाही, रस्त्यावर यावं लागेल,’ असं आव्हाड म्हणाले आहेत.

दरम्यान, यानंतर आता भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे चांगलेच आक्रमक झाले आहेत. जितेंद्र आव्हाड हे नेहमीच धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. महाराष्ट्रात सगळ्या समाजात एकवाक्यता आहे. अशात ओबीसींना ज्या प्रकारे हिनवलं गेलं, ओबीसी समाज त्यांना माफ करणार नाही. आव्हाडांनी असं वक्तव्य केल्यानं त्यांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा चेहरा समोर आला आहे. या मागचा बोलविता धनी कोण हे पाहावं लागेल. त्यांच्यासारख्या कल्पित लोकांमुळेच आरक्षण केलं. मी त्यांचा निषेध करतो. त्यांनी अजून डिवचण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही, असा इशारा बावनकुळे यांनी जितेंद्र आव्हाडांना दिलाय.

‘राजकारण आपली पोळी भाजण्यासाठी ते असं वक्तव्य करतात. शरद पवार यांनी आता सांगितलं पाहिजे की ते जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचं समर्थन करतात का? सर्व समाज एकमेकांना साथ देत आहेत, मदत करत आहेत, अशावेळी असं वक्तव्य करुन ते तेढ निर्माण करत आहेत. त्यांनी ओबीसी समाजाची माफी मागितली पाहिजे’, अशी मागणीही बावनकुळे यांनी केलीय.