आदित्य ठाकरे धमकी प्रकरण : चौकशीसाठी SIT स्थापनेची गृहमंत्र्यांची घोषणा

मुंबई : शिवेसनेचे नेते व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यास मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने (Cyber Cell) अटक केली आहे. जयसिंग राजपूत (Jaisingh Rajput) असं त्याचं नाव असून तो अभिनेता सुशांतसिंह राजपूतचा (Sushant Singh Rajput) फॅन असल्याचा दावा केला जात आहे. कर्नाटकातील बंगलुरू येथून जयसिंगला ताब्यात घेण्यात आलं आहे.

हा मुद्दा आज विधानसभेत देखील गाजला. सर्वपक्षीय नेत्यांनी ही घटना गंभीर असल्याचं म्हटलंय तर याची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी देखील केली. यावर सभागृहात बोलतना राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी या घटनेची एसआयटीची स्थापन करुन त्याच्या माध्यमातून चौकशी करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे.

दिलीप वळसे पाटील म्हणाले, सुनील प्रभू यांनी जो विषय उपस्थित केला ज्यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जी धमकी आली आहे त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला असून जयसिंग बजरंसिंग राजपूत राहणार बंगळुरू, कर्नाटक येथे असल्याचं निष्पण्ण होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

विधानसभा सदस्य असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो सर्वांचे आयुष्य, कत्याची सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून या सर्व विषयाची चौकशीसाठी मी राज्यस्तरावर एक एसआयटीची स्थापन करुन त्याच्या माध्यमातून आलेली धमकी, घडलेली घटना आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजना या संदर्भात एक धोरण तयार करण्यात येईल. एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल.