100व्या स्वातंत्र्य दिनी आदित्य ठाकरे दिल्लीतून येऊन ध्वजारोहण करतील – किशोरी पेडणेकर

Mumbai – शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) हे देशाच्या 100 व्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीत ध्वजारोहण करतील असा विश्वास शिवसेनेच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर(Former Mayor Kishori Pednekar) यांनी व्यक्त केला. शिवसेना भवनात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम झाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे वक्तव्य केले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेना भवनवर ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांची मोठी गर्दी जमा झाली होती. यावेळी किशोरी पेडणेकर यांनी म्हटले की, आज शिवसेना भवनात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. याआधी शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते 50 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवसेना भवनात ध्वजारोहण करण्यात आले होते. आता पुढे देशाचा 100 वा स्वातंत्र्य दिन असेल तेव्हा आदित्य ठाकरे हे दिल्लीतून येऊन झेंडावंदन करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.