प्रदेशाध्यक्षपदावरून पायउतार होताच चंद्रकांतदादांना पक्षाने दिला धक्का, मुनगंटीवारांचेही पंख छाटले

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. खाते वाटपानंतर यामध्ये बंडखोर गटाची अवस्था सांगता येत नाही अन् बोलताही येत नाही, अशीच झाली असली, तरी भाजपमध्ये दिग्गजांना महत्त्वाच्या खात्यांपासून वंचित ठेवल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

दरम्यान, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांचा शपथविधी झाल्यानंतर तातडीने त्यांच्याकडील भाजप (BJP) प्रदेशाध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आले. त्यानंतर खाते वाटपातही त्यांना शिवसेनेकडील उच्च आणि तंत्रशिक्षण खात्याचा कारभार मिळाला आहे. त्याबरोबर संसदीय कार्य आणि वस्त्रोद्योग खात्याचा जबाबदारी मिळाली आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांचेही महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु झाला असल्याची चर्चा रंगली आहे. दुसरीकडे राज्याचं अर्थमंत्रीपद भूषविलेल्या सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांना वन खातं देण्यात आलं आहे. त्यामुळे मुनगंटीवार यांचेही फडणवीस यांनी पंख छाटल्याचं बोललं जात आहे.

या खातेवाटपात फडणवीस (Devendra Fadnavis) समर्थकांना चांगली खाती देण्यात आली आहेत. गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा आणि अतुल सावे या फडणवीस समर्थकांना चांगली खाती देण्यात आली आहेत. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी अनेक महत्वाची खाती स्वतःकडे ठेवली आहेत.