जलयुक्त शिवार योजना घोटाळ्यात मोठी कारवाई, चौघांना अटक

मुंबई : बीड जिल्ह्यातील जलयुक्त शिवार घोटाळ्यात मागच्या महिन्यामध्ये कृषी विभागातील निवृत्त अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर पुन्हा एकदा चार जणांना परळी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. शिवाजी हजारे, विजयकुमार भताने, पांडुरंग जंगमे, अमोल कराड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यातील शिवाजी हजारे आणि विजयकुमार भताने हे दोघेजण निवृत्त तालुका कृषी अधिकारी आहेत तर कराड आणि जंगमे हे सध्या कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहेत.

बीडच्या जलयुक्त शिवार घोटाळ्यातील तीन निवृत्त अधिकाऱ्यांना गेल्या महिन्यात अटक करण्यात आली होती. पाच वर्षांपासून फरार असलेल्या तीन निवृत्त कृषी पर्यवेक्षकांना परळी पोलिसांनी अटक केली. सुनील गीते (वय 58 वर्ष), उल्हास भारती (वय 64 वर्ष) आणि त्र्यंबक नागरगोजे (वय 64 वर्ष) यांना राहत्या घरातून अटक करण्यात आली होती.

जलयुक्त शिवारातील घोटाळ्यासंदर्भात 2017 मध्ये परळी पोलीस स्टेशन मध्ये दोन कोटी 41 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. यात कृषी विभागातील कर्मचारी अधिकारी आणि कंत्राटदार यांचा समावेश होता.