भाजपच्या दिग्गज नेत्यांना बाजूला करत विखे पाटील बनले महसूलमंत्री; अनेकांच्या भुवया उंचावल्या 

मुंबई : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी जाहीर केले आहे.  प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून काल मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले. खाते वाटपानंतर यामध्ये बंडखोर गटाची अवस्था सांगता येत नाही अन् बोलताही येत नाही, अशीच झाली असली, तरी भाजपमध्ये दिग्गजांना महत्त्वाच्या खात्यांपासून वंचित ठेवल्याने राजकीय भूवया उंचावल्या गेल्या आहेत.

देशाचे गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांनी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्यावर विश्वास दाखवत महसूलसारखे वजनदार खाते त्यांना दिले आहे. या शिवाय त्यांच्याकडे पशूसंवर्धन व दुग्धविकास सारख्या खात्यांचाही कारभार असणार आहे. खरतर हे खाते माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मिळेल असं सांगितलं जात होतं मात्र पक्षाने विखे-पाटील यांच्या पारड्यात आपले वजन टाकले.

महसूल विभाग जाहीर होताच विखे पाटलांकडे अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्रीपद येईल, असे सांगितले जात आहे. ते नवीन मंत्रीमंडळातील अहमदनगर जिल्ह्याचे एकमेव मंत्री आहेत. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस विरुद्ध भाजपला ताकद देण्यासाठी विखे यांनाच पालकमंत्रीपद मिळावे अशी भाजप कार्यकर्त्यांची मागणी आहे.