आफताबच्या कोठडीत आणखी 5 दिवस वाढ, दिल्ली पोलीस नार्को टेस्टच्या मदतीने सत्य उघड करणार

नवी दिल्ली – श्रद्धा हत्येतील आरोपी आफताब पूनावालाच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. आफताबवर त्याची गर्लफ्रेंड श्रद्धा वालकरची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी आफताबला आज पोलिसांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर केले असता, त्याला आणखी पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दरम्यान, पूनावाला यांना दुपारी चार वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे साकेत न्यायालयात हजर करण्यात आले. दिल्ली पोलिसांनी पूनावालाला त्याच्या सुरक्षेच्या कारणास्तव हजर करण्याची विनंती करणारा अर्ज दाखल केला होता. मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट अविरल शुक्ला यांनी सांगितले की, पोलिसांनी सादर केलेल्या अर्जानुसार आरोपीला बदमाश आणि धार्मिक गटांकडून धमक्या येत होत्या.

अधिक पुरावे शोधण्यासाठी पोलिसांना हिमाचल प्रदेशातील पार्वती खोऱ्यात जावे लागेल, असे सांगत दिल्ली पोलिसांनी आणखी कोठडी मागितली होती. नवी दिल्लीतील बदरपूर आणि छतरपूरची जंगले खूप मोठी असून मृतदेह शोधण्यास वेळ लागेल, असेही पोलिसांनी सांगितले.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान मोठ्या संख्येने वकील न्यायालयाबाहेर जमले आणि त्यांनी ‘श्रद्धाच्या मारेकऱ्याला फाशी द्या, त्याला फाशी द्या’ अशा घोषणा देण्यास सुरुवात केली. मात्र, आफताबला न्यायालयात आणणार नसल्याचे समजताच ते तेथून निघून गेले. विशेष म्हणजे आफताबची नार्को टेस्ट केली जाणार असून यातून आणखी माहिती समोर येण्याची शक्यता आहे.(Aftab’s custody extended for another 5 days, Delhi Police will reveal the truth with the help of narco test).