‘१९४७ ला मुस्लिमांना वेगळा देश दिलाय, भारतात राहणाऱ्या मुस्लिमांचा मतदानाचा हक्क काढून घ्या’

पटना – बिहारमध्ये भाजपचे आमदार हरिभूषण ठाकूर यांनी मुस्लिमांबाबत बेताल वक्तव्य केले आहे. सरकारने मुस्लिमांकडून मतदानाचा अधिकार काढून घ्यावा, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे. ठाकूर म्हणाले, ‘1947 मध्ये धर्माच्या नावावर देशाची फाळणी झाली. तेव्हा मुस्लिमांना त्यांचा देश मिळाला होता आणि त्यांनी तिथे जायला हवे होते.

हरिभूषण ठाकूर म्हणाले, काही मुस्लिम फाळणीनंतर गेले नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचा मतदानाचा हक्क काढून घेण्यात यावा, अशी माझी सरकारकडे मागणी आहे. मुस्लिम दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून भारतात राहू शकतात. दरम्यान, हरिभूषण ठाकूर यांनीही मुस्लिम हे देशात अल्पसंख्याक असल्याचा इन्कार केला. ठाकूर म्हणाले, संविधानात अल्पसंख्याक असा कोणताही शब्द नाही. संविधानात आपण भारतीय लोकांचा उल्लेख केला आहे.

मुस्लीम एका अजेंड्यानुसार काम करतात असा आरोप ठाकूर यांनी केलाय. या अजेंड्यानुसार भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचा विचार आहे, असंही ठाकूर म्हणाले. यापूर्वीही ठाकूर यांनी अनेकदा अशाप्रकारची वादग्रस्त वक्तव्य केली आहे.या वक्तव्यानंतर बिहार भाजपाने ठाकूर यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली असून वक्तव्याचा नक्की काय अर्थ आहे यासंदर्भातील स्पष्टीकरण मागवलं आहे.