खा.राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचं पत्र वाचलेले नाही; आशिष शेलार राहुल गांधीवर बरसले

Mumbai – भारताच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांनी लिहिलेल्या एका पत्रात स्वातंत्र्यवीर सावरकरांना त्यांनी भारताचा सुपुत्र म्हटले असून त्यांचा उल्लेख वीर सावरकर असा केला आहे. तसेच सावरकर यांनी ब्रिटिशांविरोधात अतिशय धाडसी युद्ध केले, त्याची नोंद इतिहासात होईल. असे नमूद केले आहे.

राहुल गांधी यांनी स्वतःच्या आजीचं पत्र वाचलेले नाही. नेहरूजींना वाचलेले नाही. केरळ मधून निवडून आल्यामुळे हिरवा झेंडा आणि हिरव्या झेंड्याची मते एवढ्यापुरताच अभ्यास त्यांनी केलेला दिसतो. त्यामुळे त्यांचे विधान हे बेअक्कलपणाचे आहे. म्हणून त्याचा आम्ही निषेध करतो.

खरंतर हिंदुस्थानची ज्यांच्याकडून अपेक्षा होती त्या उद्धवजी ठाकरेंनी तरी बोटचेपी भूमिका घेऊ नये, असे वाटत होते. पण सत्तेसाठी माती खाल्लेल्यांनी स्वतःच्या वडिलांच्याही विचारांना तिलांजली दिली. उद्धव ठाकरेजी तुम्ही बोटचेपी भूमिका का घेतली? हा आमचा प्रश्न आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने स्वातंत्र्यप्राप्तीसाठी सक्रीय प्रयत्न केले होते. महात्मा गांधींनी त्याकाळी संघ कार्यक्रमात हजेरी लावली होती. सरसंघचालक केशव बळीराम हेडगेवार हे स्वातंत्र्यचळवळीत सहभागी होते. उद्धवजी ठाकरे या इतिहासापासून अनभिज्ञ आहेत. जे स्वतःच्या वडिलांचे विचार विसरले, त्यांच्याकडून इतिहासाच्या आकलनाची अपेक्षा नाही.