शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल आमच्यासाठी – कोल्हे

Amol Kolhe : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ‘स्वयंभू, स्वावलंबी नेता’ अशी ओळख असलेले माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी वाढदिवसाच्या निमित्त शिरुर लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. त्याअनुषंगाने जोरदार ‘ब्रँडिंग’ करण्यात येत आहे. परिणामी, पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसला विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्यापेक्षा लांडे आश्वासक वाटतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने लांडे आणि त्यांच्या समर्थकांनी भोसरीसह शिरुर लोकसभा मतदार संघात ठिकठिकाणी शुभेच्छा बॅनर उभारले आहेत. त्यावर संसदेचा चित्र लावून ‘‘भावी खासदार’’ असा सूचक संदेश दिला आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या फ्लेक्समधून विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे गायब आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत लांडे महाविकास आघाडीच्या शिरुरमधील तिकीटावर ‘क्लेम’ करणार हे निश्चित मानले जाते.

दरम्यान, शिरूर मतदार संघावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू असताना विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांची भूमिका मांडली. शिरूर लोकसभेच्या उमेवारीविषयी खासदार अमोल कोल्हे म्हणाले, माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी, मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलाला, ज्याला कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही, अशा मुलाने एखाद्या मतदार संघावर कुठलाही दावा करणं किंवा छातीठोकपणे सांगणं तर्कसंगत नाही. या सगळ्या चर्चांवर माझं एकच उत्तर आहे. शरद पवार साहेब सांगतील ते धोरण आणि बांधतील ते तोरण असेल आमच्यासाठी.असं कोळे यांनी म्हटले आहे.