Ahmednagar Politics : प्रवीण घुले भाजपात जाणार, रोहित पवार यांना धक्का

अहमदनगर – केवळ आपला मतदारसंघच नव्हे तर जिल्हा, राज्य आणि देशविदेशातील घडामोडींवर भाष्य करत चर्चेत राहणारे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे राजकीयदृष्ट्या आगामी काळात अडचणीत येवू शकतात अशी स्थिती निर्माण होऊ लागली आहे. पवार घराण्याचा वारसा चालवणारे रोहित पवार हे कर्जत-जामखेडचे आमदार आहेत. माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून ते आमदार झाले मात्र आता परिस्थिती बदलू लागली असून ज्यांनी राम शिंदे यांच्या पराभवात सिंहाचा वाटा उचलला अशी मंडळी आता रोहित पवारांची साथ सोडू लागले आहेत.

काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष प्रवीण घुले (Pravin Ghule) हेही लवकरच काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रा. राम शिंदे यांची भेट झाल्यानंतर सोमवारी रात्री घुले यांनी कर्जतमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. त्यावेळी आमदार पवार आणि काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करून लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा मनोदय व्यक्त केला. आता घुले यांच्याकडे आगामी विधानसभा निवडणुकीतील भाजपचे उमेदवार म्हणूनही पाहिले जाऊ लागले आहे.

यापूर्वी विधानसभा आणि नगरपंचायती निवडणुकीत घुले यांनी रोहित पवारांना पाठींबा दिला होता. तर सध्या घुलेंची भावजय कर्जत नगरपंचायतीत उपनगराध्यक्ष आहे. त्यामुळे रोहित पवारांसाठी हा मोठा धक्का समजला जातोय. प्रवीण घुले यांची कर्जत तालुक्यात मोठी ताकद आहे. ते जिल्हा परिषद सदस्य देखील होते. त्यामुळे माजी मंत्री राम शिंदे यांची ताकद वाढणार आहे.