“तुला जन्नतमध्ये सुद्धा माफी नाही”, आफताबच्या ‘त्या’ वक्तव्याचा तृप्ती देसाईंकडून समाचार

नवी दिल्ली – फाशी तर फाशी, जन्नतमध्ये अप्सरा मिळतील, असे भुवया उंचायला लावणारे वक्तव्य श्रद्धा वालकरचा हत्या करणारा आफताब पूनावाला याने दिले आहे. यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई (Trupti Desai) यांनी यावर लक्षवेधी प्रतिक्रिया दिली आहे.

श्रद्धा वालकर खून (Shraddha Walkar Murder Case) प्रकरणात दर तासाला खळबळजनक खुलासे होत आहेत. एकीकडे पोलीस हैराण आहेत तर दुसरीकडे सर्वसामान्य जनता दहशतीत आहे. अनेकांनी श्रद्धाची हत्या करणाऱ्या तिच्या प्रियकर आफताब अमीन पूनावाला याला क्रूर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अगदी राजकीय क्षेत्रातूनही या प्रकरणी प्रतिक्रिया येत असून बहुतांश नेत्यांनी आफताबवर टीका केली आहे.

अशातच पॉलिग्राफ चाचणीनंतर आफताबला पोलीस व्हॅनमधून नेलं जात असताना त्यावेळी किमान दोन जणांनी नंग्या तलवारी घेऊन त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यानंतर अफताबने केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आफताबने (Aftab Poonawala) आनंदानं फाशी जाईल स्वर्गात मिळेल अप्सरा, असे म्हटले आहे.

आफताबच्या तोंडून निघालेले हे शब्द ऐकून तृप्ती देसाई यांचा चांगलाच पारा चढला आहे. “आफताब, तुला फाशी होणारच आहे. परंतु जन्नतमध्ये गेल्यानंतर अप्सरा तुझे तुकडेच करतील. कारण पृथ्वीवरच्या अप्सरेचे तू तुकडे केलेत, लक्षात ठेव तुला जन्नतमध्ये सुद्धा माफी नाही”, असे तृप्ती देसाईंनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे.