“अजित पवारांना कधीही अटक होऊ शकते”, निलेश राणेंचा खळबळजनक दावा!

सिंधुदुर्ग – माजी खासदार आणि भाजपा नेते निलेश राणे यांनी केलेल्या एका विधानामुळे खळबळ उडाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना कधीही अटक होऊ शकते, असं निलेश राणे म्हणाले आहेत. कुडाळमध्ये घेतलेल्या पत्रकारक परिषदेत बोलताना त्यांनी हा दावा केला आहे.

ते म्हणाले, अजित पवारांनी सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक पुढे ढकलण्यासाठी प्रयत्न केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँक शिवसेनेच्या आणि महाविकास आघाडीच्या हातातून केव्हाच गेलीय. म्हणून त्यांना एवढे एक्सटेन्शन अजित पवारांकडून मिळाले. अजित पवारांनी जिल्हा बँकेची निवडणूक पुढे जावी यासाठी जेवढी मदत केली. त्यांना ही बँक टिकवायची कशी हेच अजून कळलेलं नाही. त्यांनी जे काय जिल्हा बँकेत धंदे करून ठेवलेत ते उद्या आम्ही बसलो की उघड होणार. अजित पवार स्वतः बेल वर बाहेर आहेत. उद्या आत मध्ये जातील. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक केसेस आहेत. म्हणून अजित पवार काय त्याना वाचू शकणार नाहीत.’

निलेश राणे म्हणाले की, ‘जिल्ह्याच्या राजकारणात सतीश सावंत असू दे किंवा असे शंभर सतीश सावंत असू देत. जिल्हा बँक त्यांच्या हातात राहू शकणार नाही. त्यांची तेवढी कुवत नाही. सतीश सावंत तेव्हा आमच्याकडे होते म्हणून त्यांना काही गोष्टी जमल्या, आता त्या जमणार नाहीत. कारण शिवसेनेतील अंतर्गत विरोध आणि मतदारांचा त्यांच्यावर असलेला अविश्वास हे सगळं गणित आमच्या पथ्यावर पडणार. त्यामुळे जिल्हा बँकेत आम्ही पैकीच्या पैकी जागा निवडूण आणणार.’