आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहोत, राष्ट्रवादीतच राहणार; ४० आमदारांच्या सह्यांच्या अफवांवर अजित पवारांनी लावला पूर्णविराम

मुंबई- गेल्या दोन दिवसांपासून विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपासोबत जाणार असल्याची चर्चा होती. अजित पवारांकडे राष्ट्रवादीच्या ५३ पैकी ४० आमदारांचे सह्या पत्र असून योग्य वेळी ते राज्यपालांकडे हे पत्र सोपवणार असल्याचीही माहिती पुढे आली होती. अखेर आज दुपारी मुंबईत पत्रकार घेत अजित पवार या सर्व बातम्या खोटे असल्याचे सांगत चर्चांवर पूर्णविराम लावला आहे.

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) 53 पैकी 40 आमदारांच्या सह्या घेतल्याचं वृत्त समोर आलं होतं. ‘द न्यू इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्राने ही बातमी दिली होती. सह्या मिळवण्यासाठी अजित पवार राष्ट्रवादीच्या आमदारांना फोन करत आहेत, असंही वृत्तात म्हटलं आहे. शिवाय यंदा शरद पवार हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, असंही द न्यू इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तात म्हटलं होतं. आता अजित पवारांनी हे वृत्त फेटाळलं आहे.

“पूर्ण आमदारांच्या सह्या घेण्याचं कारण नाही. आम्ही राष्ट्रवादीचे आमदार आहोत, राष्ट्रवादीतच राहणार आहोत. मी नेहमीप्रमाणे माझ्या ऑफिसमध्ये बसतो, अनेक जण कामानिमित्त येत असतात. नेहमीप्रमाणे आमदार मला भेटायला आले. त्यात वेगळा अर्थ काढू नका”, असं अजित पवार म्हणाले. सध्या निर्माण झालेल्या प्रश्नांवरुन लक्ष विचलित करण्यासाठीं हा प्रकार सुरु असल्याचंही अजित पवारांनी यावेळी म्हटलं.