हिंदुत्वाचा बुलंद आवाज करणाऱ्या राज ठाकरेंच्या सभेचे जम्मू-काश्मीरमध्ये होणार लाईव्ह प्रक्षेपण 

मुंबई-   महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा राज ठाकरे नावाचं वादळ आता घोंगावू लागले असून विरोधक देखील  घायाळ चित्र आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज मंगळवारी संध्याकाळी ठाण्यात सभा होत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये राज ठाकरे यांची सभा पार पडली होती. या सभेत राज यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला तोंड फुटले होते. त्यानंतर आज ठाण्यात राज ठाकरेंची उत्तर सभा होत आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर प्रथमच अशा पद्धतीने जाहीरपणे हिंदुत्वाचा पुरस्कार राज ठाकरे करत असल्याने अवघ्या देशभरातील हिंदुत्ववादी प्रभावित झाल्याचे दिसत आहे. कथित सेक्युलर पक्ष असणाऱ्या कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने घरोबा केल्याने सातत्याने हिंदुंवर अन्याय वाढले असल्याचे आरोप होत आहेत. भाजपवर टीका करण्याच्या नादात शिवसेनेने आपली मुळची विचारधारा सोडली असल्याचा दावा सेनेचे विरोधक करत असताना राज ठाकरे हे हिंदुत्वाचा आवाज बुलंद करताना दिसून येत आहेत.

दरम्यान,  दुसरीकडे काश्मीर पंडितांनाही राज ठाकरे यांची भुरळ पडली आहे. काश्मीर पंडितांनी जम्मू-काश्मीरमध्ये राज ठाकरे यांचे पोस्टर लावले आहेत. त्यावर हिंदूजननायक राजसाहब ठाकरे असा उल्लेख केला आहे. तसेच राज यांच्या आजच्या सभेचे जम्मूतील काटरा येथे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळेही राज आज नेमकं काय बोलणार याची सर्वांनाच उत्कंठा लागली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये राज ठाकरे यांच्या सभेचे पोस्टर लागले आहेत.

काश्मीर पंडितांच्या (kashmiri pandit)  काश्मीर पंडित ग्रुप, हॉटेल रिजन्सी काटरा यांच्यावतीने हे पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरवर राज ठाकरे यांचा भला मोठा फोटो आहे. त्यावर हिंदूजननायक राजसाहब ठाकरे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशी घोषणा लिहिली आहे. तसेच काटरा येथे राज यांच्या सभेचं संध्याकाळी लाईव्ह प्रक्षेपणही करण्यात येणार आहे. त्यामुळे राज यांच्या या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.