कार्यकर्ते ढसा ढसा रडत असताना अजितदादांनी घेतली वेगळीच भूमिका; म्हणाले, साहेबांच्या डोळ्यादेखत…

मुंबई- महाराष्ट्राच्या राजकारणातून आजची सर्वात मोठी बातमी पुढे येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पक्षाचे अध्यक्षपद सोडणार असल्याची घोषणा (Sharad Pawar Resigning) केली आहे. ते मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये लोक माझे सांगाती या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान बोलत होते.

गेले सहा दशके राजकीय जीवनात आहे, अनेक पदे मला मिळाली. सध्या मी राज्यसभेवर आहे. याची तीन वर्षे बाकी आहे. ही तीन वर्ष संपल्यानंतर मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही आणि कोणतीही जबाबदारी घेणार नाही, अशी घोषणा शरद पवार यांनी आज केली आहे. राद्र्म्यान, या निर्णयाला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विरोध करत असताना अजित पवारांनी (Ajit Pawar) एक वेगळीच भूमिका मांडली.

ते म्हणाले, साहेबांच्या डोळ्यादेखत अध्यक्ष तयार झाला तर तुम्हाला का नको? साहेब देशात, महाराष्ट्रात फिरणारच आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला असणारच आहे. पवार साहेब अध्यक्ष नाहीत म्हणजे पक्षात नाहीत असं नव्हे. शरद पवार यांनी निर्णय घेतला आहे. भावनिक होऊ नका. आपण नव्या अध्यक्षाच्या पाठीशी उभे राहू.कुणीही भावनिक होण्याचं कारण नाही. हा प्रसंग कधी ना कधी येणारच होता. कालच हे जाहीर करायचं होतं. साहेबांनी त्यांचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या मनात जे आहे तेच आपण करू. तुम्ही कुठेही बोलावलं तरी मार्गदर्शन ते करतील. नव्या अध्यक्षाच्या मागे आपण उभा राहू असं अजित पवार यांनी म्हटलं.

तुम्ही गैरसमज करून घेतायत. पवार साहेबांच्या वयाचा विचार करता. साहेबांशी आणि सर्वांशी चर्चा करून नव्या नेतृत्वाकडे जबाबदारी देण्यात येणार आहे. साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष नेतृत्व काम करेल. आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन करतील. पवारांच्या मार्गदर्शनाखालीच नेतृत्व काम करेल. साहेब अध्यक्ष असो किंवा नसो, आपला परिवार पुढे चालत राहणार आहे. भाकरी फिरवायची असते असं ते म्हणाले होते. मी काकींशी बोललो, ते कदापि माघार घेणार नाहीत असंही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.