‘घोटाळेबाज यशवंत जाधव यांच्यावर ईडी आणि कंपनी मंत्रालयही कठोर कारवाई करेल याची मला खात्री आहे’

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात केंद्रीय तपास यंत्रणा चांगल्याच सक्रीय झाल्या असून अनेक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक नेते यामुळे अडचणीत आले असून अनेकांचा बुरखा आता फाटू लागला आहे.सत्ताधारी आणि वरोधक एकमेकांवर चिखलफेक करत असताना आज आयकर विभागाने एक लक्षवेध कारवाई केली आहे.

दरम्यान,  गेल्या काही दिवसांपासून शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) सध्या आयकर विभागाच्या (Income Tax) रडारवर आहेत. आता आयकर विभागाकडून यशवंत जाधव यांच्याशी संबंधित मालमत्तांवर टाच आणली असून  शिवसेना (Shiv Sena) नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. भायखळ्यातील 31 फ्लॅट्स आणि वांद्रेतील 5 कोटींचा फ्लॅट आयकर खात्याकडून जप्त करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेतील (BMC) शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याशी संबंधित 41 मालमत्ता आयकर विभागानं जप्त केल्या आहेत. त्यात भायखळ्यातल्या बिलखाडी चेम्बर्स या इमारतीतील 31 फ्लॅट्स आणि वांद्रे इथल्या 5 कोटी रुपये किंमतीच्या एका फ्लॅटचा समावेश आहे. आयकर खात्यानं काही दिवसांपूर्वी जाधव यांच्या घरी आणि मालमत्तांवर छापे टाकले होते. या छाप्यात त्यांना मिळालेल्या माहितीनंतर आता जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somayya)  यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे.  शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यावर प्राप्तिकर विभागाकडून आज मुंबई येथे बेनामी मालमत्तांच्या जप्त करण्याचा कारवाईचे मी स्वागत करतो. घोटाळेबाज यशवंत जाधव यांच्यावर ईडी आणि कंपनी मंत्रालयही कठोर कारवाई करेल याची मला खात्री आहे. असं सोमय्या यांनी म्हटले आहे.