Ajit Pawar | क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाची निविदा प्रक्रिया गतीने राबवा

Ajit Pawar | महात्मा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेली भिडेवाडा येथील पहिली मुलींची शाळा येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे राष्ट्रीय स्मारक उभारण्याच्यादृष्टीने आवश्यक ती प्रक्रिया करुन गतीने निविदा प्रक्रिया राबवावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दिले.

विधानभवन येथे झालेल्या या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, मनपाचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे, मुख्य अभियंता बांधकाम युवराज देशमुख आदी उपस्थित होते.

हे स्मारक पार्किंग तसेच तळमजला अधिक तीन असे चार मजल्यांचे करण्याचा बैठकीत घेण्यात आला. पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर सावित्रीबाई फुले यांचा पुतळा, त्यांचा जीवनपट दर्शविणारे म्युरल्स किंवा चित्रमय व्यवस्था, वरील मजल्यावर त्यांच्या जीवनातील प्रसंग, कार्याची माहिती स्क्रीनवर दृकश्राव्य स्वरुपात दर्शविण्याची यंत्रणा तसेच त्यांचे लेखन साहित्य त्याशिवाय वरील मजल्यावर मुली, महिलांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्था अशी व्यवस्था करण्यात यावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री पवार आणि मंत्री भुजबळ यांनी दिले.

स्मारकासाठीच्या सभोवतालच्या जागेचे भूसंपादनासाठी राज्य शासन आणि महानगरपालिका दोन्ही यंत्रणा रक्कम देणार आहे. स्मारकाचे अंदाजपत्रक तयार करुन निविदा प्रसिद्ध करण्याच्यादृष्टीने गतीने काम करावे, अशाही सूचना यावेळी देण्यात आल्या.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप