राष्ट्रवादीला आघाडीचे सर्व मार्ग खुले, जितेंद्र आव्हाडांचा शिवसेनेला थेट इशारा

ऐरोली – महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांमध्ये आता पुन्हा एकदा धुसफूस सुरु झाली आहे. यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये शीतयुद्ध सुरु झाले असून आपल्या रोखठोक भूमिका घेण्याच्या स्वभावासाठी प्रसिद्ध असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे गृहनिर्माण जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

ऐरोली येथे घेण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मार्गदर्शन केलं. मात्र, यावेळी त्यांनी शिवसेना (Shiv Sena) आणि अप्रत्यक्षपणे एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली. मोठा भाऊ म्हणून आदर करु, मात्र बोलायचे एक आणि करायचे एक हे खपवून घेतलं जाणार नाही असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत. मौका सभी को मिलता है. त्यामुळं आम्ही कुणाबरोबर जायचं याचे पर्याय खुले आहेत,” असाही इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिलाय.

निवडणुका जवळ आल्या की सत्ताधारी शिवसेना वॉर्ड रचनेत मनमानी करते. आपल्याला निवडणूक जिंकता यावी, यासाठी शिवसेना मनपा अधिकारी , निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपल्याला सोईस्कर होईल अशा पद्धतीनं वार्ड रचना करून घेते. हा अनुभव आम्हाला ठाण्यात आला होता. जर अशी मनमानी कृत्य करून वार्ड रचना पाडली जात असेल तर ही लोकशाहीला घातक असून याकडे निवडणूक आयोगाने लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केलीय.

“आम्ही आघाडी धर्म पाळून विरोधी पक्षात असलेल्या भाजपा आमदार गणेश नाईक यांच्यावर टीका करायची. मात्र, तुम्ही पडद्यामागून संबंध ठेवायचे. मग आम्ही शत्रुत्व का घ्यायचं? राजकारणातील गणिते कधीही बदलू शकतात. मौका सभी को मिलता है. त्यामुळं आम्ही कुणाबरोबर जायचं याचे पर्याय खुले आहेत, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेला दिलाय.