उद्धव ठाकरेंना पत्र लिहिणाऱ्या राज ठाकरेंना अजित पवारांचं खणखणीत उत्तर; म्हणाले… 

सांगली  – भोंग्याच्या मुद्द्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS president Raj Thackeray)  पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray)  यांना पत्र लिहून आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्य सरकारला माझं एकच सांगणं आहे. आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. सत्ता येत-जात असते. कुणीही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही, उद्धव ठाकरे तुम्हीही नाही, असा इशारा राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना या पत्रातून दिला आहे.

त्यानंतर  विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राज ठाकरेंनी मविआ सरकारकडून याहून वेगळी अपेक्षाच ठेवायला नको होती. एवढी भाबडी अपेक्षा कशी काय ठेवली? जे सरकार लांगुलचालन करतंय, हनुमान चालिसा म्हटल्यावर राजद्रोह लावून जेलमध्ये टाकतं त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा ठेवणं चुकीचं. या सरकारविरोधात आम्ही लढतोय, त्यांनीही लढावं असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आता या पत्रासंदर्भात बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)  यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलंय. सत्तेचा ताम्रपट कोणीच घेऊन आलेलं नाही हे जगातल्या प्रत्येकाला माहितीय. आम्हालाही सगळ्यांना माहितीय. मी पण बोलून दाखवतो, कालच मी एका सभेमध्ये बोलून दाखवलेलं आहे, असं म्हटलं.

महाराष्ट्रामध्ये काम करायचं म्हटलं तर कायद्याने, घटनेनेमध्ये लोकशाहीमध्ये १४५ जी व्यक्ती स्वत:च्या पाठीशी उभी करु शकते ती व्यक्ती मुख्यमंत्री होते. हे त्रिवार सत्य आहे. त्यामध्ये कोणीही काही सांगितलं, अमक्याने व्हावं तमक्याने व्हावं, असा सांगायचा किंवा मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. त्याला कोणी नाकारणार नाही. पण कायदा सुव्यवस्था राखण्याकरता पोलीस यंत्रणेला सतर्क केलेलं आहे.

तुम्हाला तुमची मतं मांडण्याचे अधिकार आहेत पण मतं मांडताना दोन समाजांमध्ये जातीय तेढ निर्माण होणार असेल. माझ्या वक्तव्यांमुळे समाजात दुही माजणार असेल तर माझ्यावरही कारवाई करण्याचा अधिकार पोलीस खात्याला आहे. पोलीस खात्याला सांगण्यात आलेलं आहे की कशापद्धतीने काय वागलं पाहिजे, कसं केलं पाहिजे. इथं कार्यक्रम घेतला तेव्हा काय काय सुरक्षा बाळगायची हे सांगितलं जातं. प्रतिक पाटील यांच्या कार्यक्रमालाही पोलिसांनी हे सांगितलं असणार आणि आयोजक म्हणून त्यांनी हे केलं पाहिजे. जसं हे आहे तसेच परवानगी देताना काही नियम ठरवलेले असतात आणि त्याचं पालन करायचं असतं, असं अजित पवार यांनी म्हटलंय.