राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी; शेतपिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान

सोलापूर – राज्याच्या विविध भागात कालही अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसानं शेतपिकांचं आणि फळबागांचं प्रचंड नुकसान झालं आहे. पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळं आणि थंडीनं गारठून 840 जनावरं मृत्युमुखी पडल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे.

सातारा जिल्ह्यात पावसामुळं पसरणी घाटात काल दरड कोसळली. पावसानं गारठून 100 शेळ्यांचा मृत्यू झाला. टर दुसरीकडे धुळे जिल्ह्यातही काल दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची संततधार सुरू होती.

दरम्यान, येत्या 24 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. शनिवारपासून राज्यात सर्वत्र कोरडं हवामान अपेक्षित आहे.

सिंधुदुर्गातही अवकाळी पावसामुळे शेतकरी आणि बागायतदार चिंतेत आहेत. सोलापूरलाही अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. उजनी धरण क्षेत्रात सातत्यानं पाऊस पडत असल्यानं भीमा नदीत पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.