अमोल कोल्हे यांचे थेट पोलिसांवरच आरोप; ‘त्या’ प्रकरणी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली नाराजी

पुणे – छत्रपती संभाजी महाराजांवरील महानाट्याचे मोफत तिकीट दिले नाही म्हणून नाटक रोखण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार तथा अभिनेते अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील काही पोलीस कर्मचाऱ्यांवर केला आहे. या आरोपांमुळे एकच खळबळ उडाली आहे.

शिवपुत्र संभाजी या महानाट्याच्या मंचावरून अमोल कोल्हे यांनी याबाबत भाष्य केलं. अमोल कोल्हे म्हणाले, “मोफत तिकीट मागणाऱ्या प्रवृत्तीला मी एवढंच सांगतो की, इथं बसलेले सर्वजण कराचे पैसे देतात आणि त्या करातून पोलिसांना महिन्याचा पगार मिळतो. असं असूनही छत्रपतींचा इतिहास पाहण्यासाठी हे मोफत तिकिट मागतात. तसेच मोफत तिकिट दिलं नाही, तर नाटक कसं होतं ते बघतो असं म्हणतात.”

अमोल कोल्हे यांनी यावेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील उल्लेख केला. त्यांना देवेंद्र फडणवीस यांना धमकी देणाऱ्या पोलिसांना समज देण्याचं आवाहन केलं. वर्दी ही जबाबदारीची असते. याची जाणीव ठेवावी, असं अमोल कोल्हे यांनी ठणकावून सांगितलं.

दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी ट्वीट करत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. “खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करीत या प्रकरणावर नाराजी व्यक्त केली. छत्रपती संभाजी महाराज यांचा देदीप्यमान इतिहास ‘शिवपुत्र संभाजी’ या महानाट्याच्या माध्यमातून नव्या पिढीपर्यंत अतिशय प्रभावी पद्धतीने पोहोचविण्याचा प्रयत्न खासदार डॉ. अमोल कोल्हे करीत आहेत. त्यांच्या या प्रयोगांना राज्यातील शिवप्रेमी जनता उदंड प्रतिसाद देत असताना पिंपरी-चिंचवड येथील प्रयोगादरम्यान या महानाट्याच्या मोफत प्रवेशिकेसाठी येथील पोलिसांनी धमक्या दिल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या उज्ज्वल प्रतिमेला काळिमा फासणारी ही घटना आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली”, अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.