योगी सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा देणाऱ्या स्वामी प्रसाद मौर्य यांच्या विरोधात निघाले अटक वॉरंट

लखनौ – उत्तर प्रदेशचे माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एका दिवसानंतर, सुलतानपूर न्यायालयाने बुधवारी त्यांच्याविरुद्ध देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी अटक वॉरंट जारी केले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता 24 जानेवारीला विशेष खासदार-आमदार न्यायालयात होणार आहे. मौर्य यांना  24 जानेवारीला कोर्टात हजर राहावे लागेल अन्यथा  त्यांना अटक होऊ शकते.

फिर्यादीचे वकील अनिल तिवारी यांनी सांगितले की, देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी मौर्य यांच्याविरोधात १८ डिसेंबर २०१४ रोजी अटक वॉरंट जारी करण्यात आले होते, परंतु या प्रकरणात मौर्य यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनऊ खंडपीठाकडून स्थगिती आदेश काढला होता. ते म्हणाले की, स्वामी प्रसाद मौर्य यांना सहा महिने पूर्ण झाल्यानंतर १२ जानेवारी रोजी न्यायालयात हजर होणार होते, मात्र ते हजर न झाल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट जारी केले.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2014 मध्ये त्यांनी एक वादग्रस्त विधान केले होते, ज्यात कोणीही पूजा करू नये असे म्हटले होते.उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीपूर्वी भारतीय जनता पार्टी (भाजप) सोडणारे स्वामी प्रसाद मौर्य यांनी आपण समाजवादी पक्षात (एसपी) प्रवेश करणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

यूपी सरकारमधील मंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर एका दिवसानंतर, स्वामी प्रसाद मौर्य यांनी बुधवारी सांगितले की ते 14 जानेवारी रोजी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील सपामध्ये सामील होतील. उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर झाल्याच्या चौथ्या दिवशी मंगळवारी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला राज्य सरकारचे कामगार आणि रोजगार मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा दिल्याने मोठा झटका बसला आहे. ओबीसी समाजाचे दिग्गज नेते आणि 5 वेळा आमदार राहिलेले मौर्य यांनी मंगळवारी योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला होता.