बंडखोर आमदार आता परत येणार नाहीत; अनंत गीते यांनी सांगितलं नेमकं कारण

मुंबई : राज्यातील राजकीय नाट्यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. शिंदे गटातील आमदार आणि शिवसेना यांच्यातील शाब्दिक चकमक दिवसेंदिवस वाढत आहे. यातच आता शिवसेना नेते अनंत गीते (Shiv Sena leader Anant Geete) यांनी बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) टीकास्त्र सोडले आहे.

जे सुरू आहे ते दुर्दैवं आहे. फक्त वैयक्तिक स्वार्थासाठी ज्यांनी कुणी बंड केले, त्यात जनतेचं हित काय आहे? ते कोकणच्या विकासासाठी गेले आहेत का? जनतेच्या प्रश्नासाठी गेले आहेत का? त्यात नुकसानच होणार आहे. पण या सगळ्या नुकसानाला जबाबदार हे बेईमान बंडखोर असणार आहेत”, असं गीते म्हणाले.

वैयक्तिक स्वार्थासाठी गेलेल्यांपैकी एकही आता परत येणार नाहीत. ते प्रयत्न उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) करू नयेत. मी उद्धव ठाकरेंनाही सांगणार आहे. जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू.  बंडखोरांच्या गळ्यात पट्टा बांधला आहे आणि साखळी भाजपाच्या (BJP) हातात आहे.त्यामुळे त्यातला एकही परत येणार नाही, असं देखील अनंत गीते यावेळी म्हणाले.