Chhatrapati Sambhaji Raje: छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) अफजलखानाचा वध करताना जी वाघनखं (Wagh Nakhe) वापरली ती वाघनखं महाराष्ट्रात आणण्यात येणार आहेत. येत्या 16 नोव्हेंबरला ही वाघ नखं मुंबईत दाखल होतील. पण ही वाघनखं शिवरायांची नाहीतच असा दावा काही मंडळी करत आहेत. हे प्रकरण चर्चेत असताना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी महत्वाचा मुद्दा उपस्थित केला.
संभाजीराजे म्हणाले, “लंडन येथील संग्रहालयात असणारे वाघनखे महाराष्ट्रात तीन वर्षांच्या मुदतीवर प्रदर्शनासाठी आणले जात आहे. हे वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखान वधावेळी वापरले असल्याचा दावा राज्य सरकार करत आहे, मात्र अनेक इतिहास तज्ञांनी त्यामध्ये दुमत व्यक्त केले आहे.”
“२०१७ साली मी याठिकाणी भेट दिली होती. त्यावेळी तिथे लिहिलेल्या माहिती फलकावर केवळ तशी ‘शक्यता’ असल्याचे लिहिलेले पाहण्यात आले होते. सरकारने या विषयावर सर्व विचारधारेच्या इतिहास तज्ञांशी चर्चा करून एकमताने मार्ग काढावा,” असे संभाजीराजे म्हणाले.
मात्र, सातारचे छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी भेट म्हणून दिलेल्या या वाघनखांस ऐतिहासिक मूल्य आहे, हे कुणीच नाकारू शकत नाही. त्यामुळे आपल्या इतिहासाशी निगडीत ऐतिहासिक महत्त्व असणारे हे वाघनख केवळ तीन वर्षांच्या मुदतीवरच आणले जात आहे व मुदत संपल्यावर ते इंग्लंडला परत करावे लागेल, हे वेदनादायी आहे. त्यामुळे सरकारने हे वाघनख कायमस्वरूपी त्याच्या मूळ ठिकाणी, म्हणजेच महाराष्ट्रात आणण्याचे प्रयत्न करणे अधिक गरजेचे आहे, असे देखील संभाजीराजे यांनी स्पष्ट केले.