‘उद्धव सेनेला मत म्हणजे काँग्रेस–राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणे आहे’

मुंबई – भारतीय जनता पार्टीतर्फे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी (Andheri East Bypoll Election) मुरजी पटेल (Muraji Patel) यांची उमेदवारी पक्षाने शुक्रवारी जाहीर केली. मुरजी पटेल मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी व्यक्त केला.

मुरजी पटेल यांनी निवडणूक अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नेते व राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधान परिषदेतील भाजपाचे गटनेते प्रवीण दरेकर, प्रदेश उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह, खा. मनोज कोटक आणि आ. अमित साटम उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मशाल हे चिन्ह सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या हातात आहे आणि त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ आहे. त्यांनी काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार स्वीकारले आहेत. त्यामुळे उद्धव सेनेला मत म्हणजे काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसला मत देणे आहे. अशा स्थितीत युतीचा पारंपरिक मतदार उद्धव सेनेला मतदान करणार नाही. या निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांची शिवसेना युतीचे उमेदवार मुरजी पटेल निवडून येतील.