व्वा रे लेका! सचिनला आयपीएलच्या ६ हंगामातही जे जमले नाही, ते अर्जुनने दुसऱ्याच सामन्यात करुन दाखवले

मुंबई- सनरायझर्स हैदराबादविरुद्ध अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) सलग दुसऱ्या आयपीएल सामन्यात खेळला आणि आपली छाप सोडण्यात काही प्रमाणात यशस्वी झाला. माजी भारतीय दिग्गज सचिन तेंडुलकरचा मुलगा (Sachin Tendulkar’s Son) अर्जुन याने ५ वेळची चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२३ मधील सलग तिसरा विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या 20व्या षटकात डावखुरा वेगवान गोलंदाज अर्जुनने धारदार गोलंदाजी केली. यादरम्यान त्याने आयपीएलमधील त्याची पहिली विकेटही घेतली.

मुंबईच्या १९३ धावांच्या आव्हानाचा बचाव करताना अर्जुनने २.५ षटके टाकताना १८ धावा देत १ विकेट घेतली. त्यातही त्याने टाकलेले सामन्यातील विसावे षटक अत्यंत महत्त्वाचे राहिले. शेवटच्या षटकात हैदराबादला विजयासाठी २० धावांची गरज होती. अब्दुल समद क्रिजवर होता, त्यामुळे हैदराबादसाठी हे लक्ष्य फार मोठे नव्हते. या महत्त्वपूर्ण षटकात अर्जुनने दुसऱ्याच चेंडूवर अब्दुल समदला धावबाद केले आणि सामना मुंबईच्या बाजूने फिरला.

इतकेच नव्हे तर, पाचव्या चेंडूवर कर्णधार रोहित शर्माच्या हातून फलंदाज भुवनेश्वर कुमारला झेलबाद करत हैदराबादला १७८ धावांवर रोखण्यातही अर्जुनने महत्त्वाचा वाटा उचलला. भुवनेश्वरची विकेट ही त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेटही (Arjun Tendulkar 1st IPL Wicket) ठरली.

यासह अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये विकेट्स घेण्यात वडील सचिन तेंडुलकरलाही मागे टाकले आहे. सचिनने २००८ ते २०१३ या कालावधीत सलग ६ हंगाम खेळले, पण त्याला आयपीएलमध्ये एकही विकेट घेता आली नाही. सचिनने २००९ मध्येच गोलंदाजी केली होती. यादरम्यान, त्याला ६ षटकात एकही विकेट मिळाली नाही आणि त्याने १०च्या इकॉनॉमीसह ५८ धावा दिल्या.