कौतुकास्पद! गरीब क्रिकेटपटूंसाठी अलिगडमध्ये स्वत:च्या पैशातून हॉस्टेल बांधतोय रिंकू सिंग

Rinku Singh Hostel: कोलकाता नाईट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंग अनेक वर्षांपासून या फ्रँचायझीशी जोडला गेला आहे. तो संघासाठी सामनेही खेळत आहे, या वर्षी त्याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. 2018 मध्ये त्याने पहिला आयपीएल सामना खेळला होता, पण यावर्षी त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या पाच चेंडूत पाच षटकार मारून कोलकाताला विजय मिळवून दिला. त्यामुळे रिंकू सिंग (Rinku Singh) प्रकाशझोतात आला.

गरिबीत वाढलेल्या रिंकूने मोठा संघर्ष आणि मेहनत करून क्रिकेटपटू म्हणून करिअर घडवले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिंकूला आता त्याच्यासारख्या अनेक खेळाडूंना मदत करायची आहे. या कारणास्तव तो अलिगडमध्ये वसतिगृह बांधणार आहे. यासाठी त्याने 50 लाख रुपये खर्च केले आहेत. पुढील महिन्यापर्यंत हे वसतिगृह तयार होईल, अशी माहिती पुढे आली आहे.

रिंकूचे बालपणीचे प्रशिक्षक मसूदज-जफर अमिनी यांनी प्रसारमाध्यमांच्या अहवालात म्हटले आहे की, “रिंकूला नेहमीच तरुण खेळाडूंसाठी वसतिगृह बांधायचे होते, ज्यांच्याकडे त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आर्थिक संसाधने नाहीत. तो आता आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे आणि त्याचे स्वप्न साकार करत आहे. रिंकू यावर्षी केकेआर संघात सामील होण्याच्या सुमारे तीन महिन्यांपूर्वी हे काम सुरू झाले आहे. वसतिगृहात 14 खोल्या असतील आणि प्रत्येक खोलीत चार खेळाडू राहू शकतील. तसेच शेडही बांधण्यात येत आहे. स्वतंत्र स्वच्छतागृहेही बांधली जात आहेत. खेळाडूंना कॅन्टीनमध्ये जेवता येणार आहे. यासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च येणार असून संपूर्ण खर्च रिंकू करणार आहे.’

दरम्यान रिंकू सिंगने या मोसमात केकेआरसाठी पाच सामन्यांमध्ये 162.62 च्या स्ट्राइक रेटने 174 धावा केल्या आहेत. यात त्याच्या एका अर्धशतकाचा समावेश आहे. तथापि, त्याची सर्वात संस्मरणीय खेळी गुजरात टायटन्सविरुद्ध घडली जेव्हा त्याने शेवटच्या षटकात यश दयालला सलग पाच षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला.