बेरोजगार युवकांना सतीश घाटगेंच्या प्रयत्नातून मिळणार शेतमाल वाहतुकीची वाहने

जिल्हा उद्योग केंद्राची योजना: ३५ टक्के अनुदानावर मिळणार लाभ

अंबड: राज्य शासनाच्या मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत घनसावंगी मतदारसंघातील बेरोजगार युवकांना ३५ टक्के अनुदानावर शेतमाल वाहतूक करणाऱ्या वाहनांचे वाटप करण्यात येणार आहे. यासाठी समृद्धी कारखान्याचे चेअरमन तथा भाजप नेते सतीश घाटगे यांच्या पुढाकारातून शेतकरी व बेरोजगार युवकांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. शेतमाल वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकरी व युवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सतीश घाटगे यांनी केले आहे.

सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्व:ताचा उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राच्या वतीने व्यवसाय प्रशिक्षणासह उद्योग -व्यवसाय उभारण्यासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाते. जिल्हा उद्योग केंद्राच्या याच योजनेचा एक भाग असलेली ही योजना असून या योजनेंतर्गत शेतकरी व बेरोजगार युवकांना ३५ टक्के अनुदानावर विविध प्रकारची शेतमाल वाहतूक करणारी वाहने वाटप करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र व्यक्तींना वाहनाच्या एकूण किंमतीपैकी केवळ ५ ते १० टक्क्यापर्यंत स्व: हिस्सा भरावा लागणार आहे.

या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी शेतीला शास्वत उत्पन्न देणारा जोडधंदा सुरु करू शकतात. म्हणून या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकरी कुटुंबाना देण्यासाठी घनसावंगी मतदारसंघात जिल्हा उद्योग केंद्राच्या सहकार्यातून १ ते ३० ऑगस्ट दरम्यान विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. शेतमाल वाहतूकीचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असलेल्या शेतकरी व युवकांनी दिलेल्या मुदतीत सतीश घाटगे यांच्या अंबड येथील जनसेवा कार्यालयात आवश्यक कागदपत्रासह अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड, पॅन कार्ड, टी.सी, राशन कार्ड, सातबारा /उद्योग आधार, घराचा ८ -अ ठ नमुना, सहा महिन्याचे बँक स्टेटमेंट, दोन पासपोर्ट फोटो, जामीनदाराचे फोटो त्यांचे आधार, पॅन कार्ड व दोन फोटो.

योजना सर्व घटकांसाठी लागू : ही योजना सर्व प्रवर्गातील व्यक्तीसाठी लागू आहे. १८ ते ५० वायोगटातील व्यक्ती यासाठी अर्ज करू शकतात. पात्र व्यक्तीला हव्या असलेल्या वाहनाच्या एकूण किंमतीपैकी किमान ५ ते १० टक्क्यापर्यंत स्व: हिस्सा भरने बंधनकारक राहील.