श्रीराम व हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंद घाला : कॉंग्रेस 

मुंबई –  ओम राऊत दिग्दर्शित आदिपुरुष (Adipurush directed by Om Raut) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांच्या मनात प्रचंड उत्सुकता होती. परंतु हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात निराशा झाल्याचं दिसत आहे. या चित्रपटात दाखवल्या गेलेल्या दृश्यांवर प्रेक्षक नाराजी व्यक्त करत आहेत. पण तरीही हा चित्रपट चांगली कमाई करताना दिसत आहे.
यातच आता कॉंग्रेसने या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली आहे.  आदिपुरुष चित्रटातून श्रीराम व हनुमान यांचा अपमान करण्यात आला आहे. भाजपा हिंदुत्वाचे सरकार असल्याचा डांगोरा पिटते आणि श्रीराम व हनुमानाचा अपमान करणारा चित्रपट येतो पण त्यावर भाजपा काहीच बोलत नाही. हनुमानाच्या तोंडी टपोरी संवाद देण्यात आले आहेत. चित्रपटाच्या नावाखाली कार्टून बनवले आहे. सेंसॉर बोर्ड काय झोपा काढत होता काय? श्रीराम व हनुमानाचा अपमान करणाऱ्यांनी जनतेची माफी मागितली पाहिजे. श्रीराम व हनुमानाचा अपमान करणाऱ्या ‘आदिपुरुष’ चित्रपटावर बंद घालावी, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.