‘अमर रहे’च्या घोषात शहीद जवान क्षीरसागर यांना अखेरचा ‘जय हिंद’

नाशिक : भारतीय सैन्यात कर्तव्य बजावत असताना नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील जवान प्रसाद कैलास क्षीरसागर यांना अरूणाचल प्रदेश येथे वीरमरण आलं. त्यांच्यावर गुरुवारी मोठ्या शोकाकुल वातावरणात दिंडोरी येथे अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी लोकांचा मोठा जनसमुदाय त्यांच्या अत्यंसंस्कारावेळी उपस्थित झाला. शहीद जवान, अमर रहे… या घोषणांनी तेथील संपूर्ण वातावरण दुमदुमून गेला.

जवान प्रसाद कैलास क्षीरसागर हे अरूणाचल प्रदेशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत होते. सोमवारी 14 फेब्रुवारी रोजी सैन्यदलाच्या कँम्पमधून सेवेच्या ठिकाणी जात असताना त्यांचा ट्रक दरीमध्ये कोसळला. त्या ट्रक मध्ये बसलेल्या सैनिकांसोबत क्षीरसागर देखील बसले होते. अचानक ट्रक दरीमध्ये कोसळ्याने ते शहीद झाले. शहीद क्षीरसागर यांच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी होती. त्यांच्या पश्चात आईवडील, भाऊ, बहिण असा परीवार होता.

३० जानेवारी रोजी ते घरी सुट्टीवर आले होते. आईवडिलांचा आशीर्वाद घेऊन ते पुन्हा देश सेवा करण्यासाठी सीमेवर गेले. अशातच आता शहीद झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबाला समजल्यावर त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. अरूणाचल प्रदेश येथून त्यांचे पार्थिव आज सकाळी गावी आणलं. त्यानंतर दिंडोरी येथील सिडफार्म येथील शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी देखील त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांनी आपल्या शोक संदेशात असं म्हणाले की, देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना दिंडोरी येथील जवान प्रसाद क्षीरसागर यांना अरुणाचल प्रदेश येथे वीरमरण आले आहे. हे अतिशय दु:ख झाले. सैन्यदलात भरती झालेले प्रसाद क्षीरसागर यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ठ अशी कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारतमातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. त्यांच्या निधनाने क्षीरसागर कुटुंबासोबतच संपूर्ण जिल्ह्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय शहीद जवान प्रसाद क्षीरसागर यांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.