प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील गाड्यांचा अपघात ; बंगरूळु- पुणे महामार्गावरील घटना

सातारा : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात झाला आहे. हा अपघात सातऱ्यातील पारगाव खंडाळा भागात झाल्याचं सांगितले जात आहे. दरेकर यांच्या वाहनांचा ताफा हा बंगळूर महामार्गावरून कोल्हापूरच्या दिशेने जात होता. या वाहनांच्या ताफ्यातील एक गाडी पुढच्या गाडीला येऊन धडकली. त्यामुळे अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. या अपघातात कोणतीही जीवतहानी झालेली नाही. तसेच प्रवीण दरेकर देखील सुखरूप आहेत.

प्रवीण दरेकर हे कोल्हापूरच्या दिशेने जात होते. त्यांच्या वाहनांतील ताफ्यात असलेल्या मागच्या गाडीतील ब्रेक अचानक फेल झालेत. त्यामुळे ती मागची गाडी थेट पुढच्या गाडीला येऊन धडकली. यावेळी ड्रायव्हरने सावधगिरी दाखवत गाडीवर नियंत्रण ठेवल्याने मोठा अपघात टळला. दोन्ही गाड्या थोड्या अधिक खरचल्या आहेत. मात्र या अपघातात कुणीही इजा झाली नाही.

अपघात झाला तेव्हा प्रवीण दरेकर दुसऱ्या गाडीमध्ये बसले होते. त्यामुळे त्यांनाही कोणतीही मोठी दुखापत झाली नाही. त्यानंतर ते स्वतः आपल्या गाडीतून उतरून अपघात झालेल्या वाहनांची पाहणी केली. तसेच त्यांनी वाहनात बसलेल्या अधिकाऱ्यांची देखील विचारपूस केली. त्यानंतर ते आपल्या नियोजित दौऱ्यासाठी कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाले.

सध्या राज्यात रस्त्यावरील अपघातांची संख्या वाढत चालली आहे. बऱ्याचदा रस्त्यावर ड्रायव्हर वेगाने वाहन चालवताना दिसून येते. त्यामुळे रस्त्यावरील अपघातांचा प्रश्न या घटनेनंतर पुन्हा एकदा समोर आला आहे.