अरविंद केजरीवालांना सत्तेची नशा;अण्णा हजारे यांची टीका 

अहमदनगर – दिल्ली सरकारच्या नवीन मद्यविक्री धोरणामुळे मद्यपान व मद्यविक्रीला प्रोत्साहन मिळणार आहे. एकेकाळी दारूबंदी, व्यसनमुक्तीसाठी आवाज उठवणाऱ्या आपल्यासारख्या कार्यकर्त्यांकडून अशा वर्तनाची अपेक्षा नव्हती , अशा शब्दांत नाराजी व्यक्त करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (CM Arvind Kejriwal) यांना पत्र लिहून खडसावले आहे.

मद्याची जशी नशा चढते तशी सत्तेची नशा आपणास चढली असल्याचा टोलाही हजारे यांनी केजरीवाल यांना लगावला आहे.  जनलोकपाल आंदोलनाच्या निमित्ताने आपण व दिल्लीचे सध्याचे शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया अनेक वेळा राळेगण सिद्धी येथे आला होतात. त्या वेळी तुम्ही राळेगण सिद्धीतील व्यसनमुक्तीचे कौतुक केले होते. मात्र सत्तेत आल्यावर मात्र तुम्ही या गोष्टी विसरलात याची खंत वाटते.

भ्रष्टाचार विरोधी जनआंदोलनाच्या कार्यकर्त्यांबद्दल (टीम अण्णा) जनतेमध्ये विश्वास निर्माण झाला होता. त्यामुळे कार्यकर्त्यांनी देशभर फिरून जनजागृती, लोकशिक्षण करणे अपेक्षित होते, याची आठवण अण्णा हजारे यांनी केजरीवाल यांना पत्रात करून दिली आहे. आपण त्या मार्गाने गेला असता तर सर्वसामान्यांची कुटुंबे उद्ध्वस्त करणारे मद्यधोरण आपण राबवले नसते, असे हजारे यांनी केजरीवाल यांना उद्देशून पत्रात म्हटले आहे.