‘जोपर्यंत शरद पवार यांची शक्ती सरकारच्या मागे आहे तोपर्यंत कितीही प्रयत्न झाले तरी सरकार पडणार नाही’

कोल्हापूर – राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे पुरोगामी सरकार आहे फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराने पुढे जाणारे सरकार आहे. जो पर्यंत या सरकारच्या पाठीमागे शरद पवार नावाची शक्ती उभी आहे तोपर्यंत राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारला काहीही होणार नाही असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे. कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे पार पडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते..

यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यातले महाविकास आघाडी सरकार हे सर्व घटकांना पुढे घेऊन जाणारे आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच राज्याचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात राज्याने सर्व घटकांना समान न्याय दिला आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिम्मीताने हे वर्ष “कृतज्ञता पर्व” म्हणुन आपण साजरे करणार आहोत त्यानिम्मीताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापुर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मारकासाठी देखील आवश्यक निधी आपले महाविकास आघाडी सरकार उपलब्ध करून देणार आहे.

कोल्हापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या बैठकीत कोल्हापूर जिल्हाध्यक्ष ए. वाय पाटील, शहराध्यक्ष आर. के पोवार, माजी आमदार के.पी पाटील, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष दादासाहेब चोपडे, अनिल साळोखे, व्ही.बी पाटील, सुनिल देसाई, भैया माने, राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष जाहिदा मुजावर, समता परिषद शहराध्यक्ष शीतल तिवडे, तसेच सर्व नगरसेवक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी विरोधकांवर टीका करताना मंत्री छगन भुजबळ म्हणाले की या देशाचे केंद्र सरकार, राज्य सरकार आणि तिसरे ईडी, सीबीआय यांचे सरकार आहे. या संस्थांचा गैरवापर केला जात आहे. महाविकास आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा प्रयत्न काही मंडळी करत आहे. मात्र राज्य सरकार विकास कामावर लक्ष देण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणूनच राज्याच्या अर्थसंकल्पात राज्य सरकारने सर्वांसाठीच भरीव तरतुद केली आहे.शेतकऱ्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी शासनाने भरीव तरतूद प्रस्तावित केली आहे.