काश्मीर फाईल्स ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे – असीम सरोदे

पुणे – काश्मिरी पंडितांच्या व्यथा मांडणाऱ्या द काश्मीर फाईल्स या सिनेमाची सध्या बरीच चर्चा होताना दिसत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले आहे. या चित्रपटात अनुपम खेर यांच्यासोबत मिथुन चक्रवर्ती, दर्शन कुमार, पुनीत इस्सार, मृणाल कुलकर्णी, अतुल श्रीवास्तव आणि पृथ्वीराज सरनाईक कलाकार आहेत. या चित्रपटाला काही ठिकाणी विरोध देखील होताना दिसत आहे तसेच काही मंडळी यावर टीका देखील करताना दिसत आहेत.

यातच आता वकील असीम सरोदे यांनी केलेली एक फेसबुक पोस्ट देखील चर्चेचा विषय बनली आहे. आपल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, काश्मीर फाईल्स ही असत्यालाप करणारी आणखी एक फिल्म आहे. असत्याला सत्याचे कपडे घालण्याचे प्रकार वाढले आहेत. या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असून सरोदे यांना ट्रोल देखील केले जात आहे.

दरम्यान, दुसऱ्या बाजूला जम्मू काश्मीर मध्ये मुस्लिम दहशतवादाला बळी पडलेल्या हिंदूंचं चित्रण करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ हा चित्रपट राज्यात कर मुक्त करावा अशी मागणी भाजपा मुंबई प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केली आहे. जम्मू काश्मीर मधील हिंदू समाजावर मुस्लिम दहशतवाद्यानी अनन्वित अत्याचार केले याचं योग्य आणि खरं चित्रीकरण एका चित्रपटाच्या माध्यमातून या देशातील जनतेसमोर येत आहे. त्यामुळे हिंदुत्ववादी भूमिका घेणारे मुख्यमंत्री हा चित्रपट अनेक लोकांनी पहावा याकरिता नक्कीच प्रोत्साहन देतील असा विश्वास आहे असेही शेवटी आ. भातखळकर म्हणाले.