Netflix युजर्ससाठी वाईट बातमी; मित्रांसोबत पासवर्ड शेअर करणे पडणार महागात

अनेकदा असे दिसून येते की लोक नेटफ्लिक्सचे सबस्क्रिप्शन घेत नाहीत, तर त्याऐवजी त्यांचा नेटफ्लिक्स पासवर्ड घेऊन त्यांच्या मित्रांकडून किंवा ओळखीच्या व्यक्तींकडून चित्रपट किंवा वेब सिरीज पाहतात. नेटफ्लिक्सच्या ग्राहकांच्या संख्येपेक्षा पासवर्ड शेअर करून पाहणाऱ्यांची संख्या अधिक आहे. मात्र, आता नेटफ्लिक्सने ही व्यवस्था संपवण्यास सुरुवात केली आहे.

नेटफ्लिक्सने जाहीर केले आहे की ते एकाच घरात न राहणाऱ्या लोकांमध्ये पासवर्ड शेअर करण्याची प्रथा बंद करणार आहे. कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे की पासवर्ड शेअर करणाऱ्या लोकांकडून अतिरिक्त शुल्क आकारण्याचीही योजना आहे.

Netflix ने सध्या पेरू, कोस्टा रिका आणि चिली येथे चाचणी म्हणून ही नवीन प्रणाली लागू केली आहे. तेथे ग्राहकांना सवलतीच्या दरात त्यांच्या खात्यात अतिरिक्त वापरकर्ता जोडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. चिलीमध्ये 2,380 चिलीयन पेसो (अंदाजे रु 230), कोस्टा रिकामध्ये $2.99 (अंदाजे रु. 230) आणि पेरूमध्ये 7.9 पेन्स (अंदाजे रु. 160) असा सवलत दर आहे.

ही चाचणी यशस्वी झाल्यास, Netflix लवकरच मानक आणि प्रीमियम योजना असलेल्या वापरकर्त्यांना त्यांच्या खात्यात दोन लोकांना जोडण्यासाठी दोन उप-खाती तयार करण्याची परवानगी देईल, ज्यासाठी त्यांना अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.