आदित्य ठाकरे यांचं ‘ते’ वक्तव्य थापा मारणारं नाही, जी वस्तुस्थिती आहे तीच त्यांनी मांडली – थोरात

Mumbai – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने (Gandhian Institute of Technology and Management – GITAM) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा दावा केला आहे.

आदित्य ठाकरे यांच्यावर एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांनी जोरदार हल्लाबोल केला असला तरी यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस कडून प्रतिक्रिया आलेली नव्हती. त्यावर नुकतीच कॉंग्रेसचे बडे नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी भाष्य केले आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले , आदित्य ठाकरे यांचं वक्तव्य थापा मारणारं नाही. जी वस्तुस्थिती आहे तीच त्यांनी मांडली असावी, मी त्यांना जवळून ओळखतो असा दावा केला आहे. एकूणच आदित्य ठाकरे यांच्या संदर्भात कॉंग्रेसकडून ही प्रतिक्रिया आली आहे.