‘आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये, सत्ता गेल्यानंतर शहाणपण येईल असं वाटत होतं पण…’

Mumbai – राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालाआधी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडाबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. एकनाथ शिंदे यांनी जेलमध्ये जाण्याच्या भीतीने बंड पुकारत भाजपसोबत सत्ता स्थापन केली, असा मोठा गौप्यस्फोट आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

भाजपमध्ये गेलो नाही तर मला जेलमध्ये टाकतील, असं एकनाथ शिंदे म्हणाले होते. तसेच एकनाथ शिंदे त्यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवास्थानी येऊन अक्षरश: रडले होते, असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला आहे. हैदराबाद येथील गितम विद्यापीठाने (Gandhian Institute of Technology and Management – GITAM) आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी हा दावा केला आहे.

दरम्यान, याच मुद्द्यावरून आता भाजप नेते तथा महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. याच दरम्यान विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना सल्लाही दिला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत असतांना विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

भाजप नेते, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदित्य ठाकरे यांचा पप्पू होऊ नये अशी खोचक टीका केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या विधानावर बोलतांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे वक्तव्य केले आहे.

सत्ता गेल्यानंतर शहाणपण येईल असं वाटत होतं पण तसं झालं नाही अशीही जहरी टीका विखे पाटील यांनी केली आहे. एकनाथ शिंदे हे रडणारे नेते नाहीत, लढणारे नेते आहेत याची प्रचिती महाराष्ट्राने अनुभवली आहे असं म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर स्तुतिसुमणं उधळली आहे.