सावरकरांची माफी मागा, मगच महाराष्ट्रात पाय ठेवा! बावनकुळे यांचा राहुल गांधींना इशारा

महाराष्ट्रात पाय ठेवण्यापूर्वी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांची माफी मागावी. नंतरच महाराष्ट्रात पाय ठेवावा, असा इशारा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिला.

नागपूर येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त संविधान चौकातील पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर माध्यमाशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा पाच वेळ अपमान केला. आताही त्यांची आडमुठी भूमिका कायम आहे ; त्यांनी माफी मागितलेली नाही. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांची वारंवार अवहेलना केली. त्यांचा इतिहास पुसून टाकण्याचा प्रयत्न केला. जाणीवपूर्वक नाव घेऊन अपमान करीत राहिले. त्यांनी सावरकरांविषयी बोलू नये. त्यांची उंची नाही, पात्रताही नाही. त्यांना याबाबत समजावून सांगितले. मात्र त्यांच्यात कोणताही फरक पडला नाही. उद्धव ठाकरे यांना भेटण्यापूर्वी (Rahul Gandhi To Meet Uddhav Thackeray) स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सर्व वक्तव्याची माफी राहूल गांधी यांनी मागावी.’

बावनकुळे म्हणाले, ‘भारतात राहणारा प्रत्येक नागरिक, मग तो कोणत्याही धर्माचा अथवा समाजाचा असो तो भारतीय आहे. भारत हाच हिंदुस्तान असल्याने त्यांचे विचार हिंदुत्ववादी आहेत. हिदुस्तान हाच भारत आहे’.